मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 08:29 AM2024-10-23T08:29:46+5:302024-10-23T10:12:29+5:30
Maharashtra Assembly Election 2024, Aditya Thcakeray vs Sandip Deshpande: गेल्या वेळच्या निवडणुकीत ठाकरे घराण्याचा पहिला व्यक्ती निवडणूक लढवत होता. यामुळे राज ठाकरेंनी वरळीतून उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे शिवसेनेची आणि त्यापूर्वी मनसेची उमेदवार यादी जाहीर झाली आहे. मनसेने जवळपास मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश मतदारसंघात ठाकरे गटाला आव्हान उभे केले आहे. मनसेचे त्या त्या मतदारसंघात चर्चेत असणारे उमेदवार आहेतच परंतू एक मोठा लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे आदित्य ठाकरेंचावरळी, या मतदारसंघात मनसेने संदीप देशपांडेंना उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे केले आहे.
गेल्या वेळच्या निवडणुकीत ठाकरे घराण्याचा पहिला व्यक्ती निवडणूक लढवत होता. यामुळे राज ठाकरेंनी वरळीतून उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती. याची राज्यभरात स्तुती झाली होती. परंतू यंदाच्या निवडणुकीत राज यांनी वरळीतून उमेदवार दिला आहे. आदित्य ठाकरे वरळीतून लढण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत शिंदेंच्या बंडामुळे वरळीतील परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेची काही मते ही शिंदेंच्या गोटात गेली आहेत. यामुळे आधीच भाजपापासून फारकत घेतलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आपलीच काही मते गमवावी लागली आहेत. आता तर मनसेनेही उमेदवार दिल्याने या मतविभाजनात आणखी भर पडणार आहे.
मनसेने उमेदवार दिल्याने आदित्य ठाकरेंच्या समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे शिंदेंनी अद्याप आपले मुंबईतील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. माहिममधून राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे हे उभे ठाकले आहेत. आता उद्धव ठाकरे शिवसेना आणि महायुती अमित ठाकरेंविरोधात काय भूमिका घेतात याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघही बदलू शकतात, अशी चर्चा आहे.
अमित ठाकरेंना उमेदवारी दिली तर माहिममध्ये ठाकरे गट उमेदवार देणार नाही, असे सांगितले जात होते. परंतू, मनसेने वरळीत आदित्य ठाकरेंना आव्हान दिल्याने आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
मविआचे जागावाटप...
काँग्रेस आणि उद्धवसेनेतील वाद शमल्यानंतर मंगळवारी सुरू झालेल्या महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ रात्री उशीरापर्यंत सुरू होते. रात्री उशीरा ठरल्यानुसार काँग्रेस आणि उद्धवसेनेतील जागा वाटपावर मार्ग काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस सर्वाधिक १०५ च्या घरात जागा लढणार आहे, त्याखालोखाल उद्धवसेना ९५ च्या घरात आणि शरद पवार गट ८४ च्या घरात जागा लढवणार असून उरलेल्या जागा लहान मित्र पक्षांना सोडण्यात आल्याचे मविआतील सूत्रांनी सांगितले. दीर्घ काळ चाललेल्या या बेैठकीत मविआला पाठिंबा दिलेल्या लहान पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा झाली.