मनसेचा तृप्ती देसाईंना इशारा; इंदोरीकर महाराजांना काळं फासण्याचा प्रयत्न केल्यास...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 06:19 PM2020-02-18T18:19:54+5:302020-02-18T19:13:39+5:30
भाजपापाठोपाठ मनसेनेही इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ या प्रकरणात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय.
पुणे - गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या इंदोरीकर महाराजांना काळं फासू असा इशारा भूमाता ब्रिगेडने दिल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरुन रान उठवलं गेलं, इंदोरीकर महाराजांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. तरीही त्यांच्यावर काळं फासण्याचं प्रयत्न केल्यास त्या शूर्पणखा महिलेचे नाक कापू असा इशारा मनसेच्या पुणे महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, समाजातील वाईट प्रवृत्तीविषयी इंदोरीकर महाराजांनी अनेकदा प्रबोधन केलं. इंदोरीकर महाराजांनी अनेकांचे संसार बसवले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. मात्र आज काही शूर्पणखा महिलेने चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिला आहे. ते अत्यंत निंदणीय आहे तसेच स्त्री असण्याचा गैरफायदा आहे असं सांगत तृप्ती देसाईंवर निशाणा साधला आहे.
तसेच या शूर्पणखा महिलेला आव्हान आहे की, तु ये काळं फासायचं प्रयत्न कर मग तुझं नाक कसं कापायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. मग ते काळं कोणाच्या तोंडाला लागेल हे उघड्या डोळ्यानं पाहता येईल. त्यामुळे आता बस्स, प्रचंड गोष्टी सहन केल्या, स्त्री म्हणून कोणतीही चुकीची गोष्ट सहन करणार नाही, त्यामुळे तिच्यामुळे समस्त स्त्री वर्ग नाहक बदनाम होत आहे असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपापाठोपाठ मनसेनेही इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ या प्रकरणात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, खुद्द इंदोरीकर महाराजांनी माफी मागणारे पत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोलले आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
इंदोरीकरांनी जाहीर केलेल्या माफीपत्रात म्हटलंय की, मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या २६ वर्षांपासून समाजप्रबोधनाचे आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत आहे. गेल्या २६ वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले. मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे. माफी मागताना त्यांनी सर्व वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि आई समान असलेल्या सर्व महिला वर्गांना उद्देशून हा माफीनामा जारी केला आहे.
व्हिडिओ