मनसे स्वबळावरच लढणार
By Admin | Published: January 12, 2017 04:40 AM2017-01-12T04:40:21+5:302017-01-12T04:40:21+5:30
प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू, असे काल सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज
मुंबई : प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू, असे काल सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लगेच महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचे सांगितले. युतीसाठी मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आले नाही. त्यामुळे या सर्व चर्चेला सध्या तरी काही अर्थ नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या वॉररूमचे बुधवारी राज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी फेसबुक लाइव्ह चॅटद्वारे राज यांनी लोकांशी संवाद साधला. युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू, या राज यांच्या मंगळवारच्या विधानाबाबत विचारले असता, युती करणार असल्याची निव्वळ अफवा असून, तसे वक्तव्य आपण केले नसल्याचे राज यांनी स्पष्ट
केले.
मुंबईतील सर्व २२७ जागा मनसे लढविणार आहे, असे सांगतानाच, त्यांनी शिवसेना-भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा आणि शिवसेनेकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही. आता त्यांच्याकडे फक्त पैसा असून, त्याच्या जोरावर अन्य पक्षातील लोकांना फोडत आहेत, असे राज म्हणाले. महापालिकेतील भ्रष्टाचारासाठी शिवसेनेसोबत भाजपाही तितकीच जबाबदार आहे. दोघांनी मिळूनच ‘फावडा मारला ना’ असा टोमणाही त्यांनी हाणला.
मनसेला लागलेल्या गळतीबद्दल विचारले असता, ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी जावे, पक्षात अनेक जवळचे लोक आहेत. मी ट्रेलर दाखवत नाही, थेट पिक्चरच दाखवतो, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पुढे काय करेन, हे आत्ताच सांगू शकत नाही, असेही राज म्हणाले. लाइव्ह चॅटमध्ये राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाचा मुद्दा मांडला. मनसेने नाशिकमध्ये चांगले काम केले आहे. सत्तेवर आल्यापासून नाशिक महापालिकेचे कर्ज फेडून आम्ही काम केले. जे विकले गेले, त्यावर मी बोलणार नाही, पण आता महापालिकेत पुन्हा मनसेचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ने केले निष्पक्ष वार्तांकन
‘लोकमत’ एक निष्पक्ष वर्तमानपत्र असून, नोटाबंदीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर वार्तांकन करताना, ‘लोकमत’ने दोन्ही बाजू मांडल्या. कुणा एकाची तळी उचलली नाही, अशा शब्दांत राज यांनी ‘लोकमत’च्या निष्पक्ष वार्तांकनाचे कौतुक केले. वर्तमानपत्रे, चॅनल्स विकले गेल्यासारखे बातम्या देत आहेत. या सर्व परिस्थितीत ‘लोकमत’सारखे वर्तमानपत्र निष्पक्षपणे वार्तांकन करत आहे, अशा शब्दांत राज यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले.