ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 11:47 AM2021-11-08T11:47:18+5:302021-11-08T11:47:47+5:30
एसटी कर्मचारी कामगार जगला तरच एसटी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे असं पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लिहिलं होतं.
मुंबई – एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात ST कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. २९ ऑक्टोबरला औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आदेश दिले होते. तरीही कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासोबतच अनेक दुर्देवी घटना घडत आहेत. एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.
आता मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgoankar) यांनी पत्र काढून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात म्हटलंय की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात(ST Employee Agitation) महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच एसटी कर्मचारी कामगार जगला तरच एसटी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे या पत्राद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे अशी राज ठाकरेंचे आदेश आहेत असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
...तर असंतोषाचा उद्रेक होईल
दिवाळीच्या दिवशीच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली होती. कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारामध्ये सुरू आहे तिथंही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करुन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्यात येत आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं होतं.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अन्यथा कर्मचारी कामगारांबाबत असंतोषाचा उद्रक होईल, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं.