मनसे तटस्थ राहणार !
By admin | Published: December 12, 2015 02:15 AM2015-12-12T02:15:31+5:302015-12-12T02:15:31+5:30
विधान परिषदेच्या मुंबईतील दोन जागांच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या मुंबईतील दोन जागांच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक तटस्थ राहणार असल्याचे शुक्रवारी मनसेने जाहीर केले. त्यामुळे मनसेच्या २८ सदस्यांच्या पाठिंब्याच्या आशेवर असणाऱ्या भाजपाचे गणित बिघडले आहे. तर, काँग्रेसच्या भाई जगतापांचा मार्ग सुकर झाला आहे.
विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यात मुंबई महापालिकेच्या दोन जागा आहेत. शिवसेनेतर्फे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, काँग्रेसतर्फे आमदार भाई जगताप, भाजपातर्फे नगरसेवक मनोज कोटक यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, राष्ट्रवादीच्या प्रसाद लाड यांनी पक्षाचा राजीनामा देत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबई महापालिकेत एकूण २२७ नगरसेवक असून शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ ७५ पेक्षा जास्त असल्याने रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर, दुस-या जागेसाठी भाजपाचे मनोज कोटक, काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेसकडे ५२ नगरसेवक आहेत तर भाजपाकडे ३२. दोन्ही पक्षांना मनसे व समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)