Raj Thackeray प्रत्येक टोल नाक्यावर मनसैनिक उभा ठाकणार, नाहीतर टोलनाके जाळणार; राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 11:38 AM2023-10-09T11:38:32+5:302023-10-09T12:08:09+5:30
राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा टोलविरोधी अस्त्र उगारले आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांचे टोलमुक्तीचे भाषण, मनसेने आंदोलन उभारल्यानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचे टोल माफी देण्याचे भाषण पत्रकार परिषदेत दाखविले.
टोलच्या पैशांच्या झोलवरून राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओ नाद छेडला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांपासून उद्धव ठाकरे, फडणवीस आणि गोपिनाथ मुंडेंना देखील सोडलेले नाही. टोलच्या पैशांचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना कंत्राटं कशी मिळतात? असा सवाल केला आहे.
राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा टोलविरोधी अस्त्र उगारले आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांचे टोलमुक्तीचे भाषण, मनसेने आंदोलन उभारल्यानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचे टोल माफी देण्याचे भाषण पत्रकार परिषदेत दाखविले. याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे ही दोन व्हिडीओ दाखविण्यात आले.
यामध्ये फडणवीस यांनी राज्यात टोलमाफी देण्यात आली असून फक्त मोठ्या कमर्शिअल गाड्यांनाच टोल आकारला जात आहे, असे सांगितले होते. हे खरे आहे का? तुम्हाला कार घेऊन जात असताना टोल भरावा लागत नाहीय का? फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे कार, रिक्षा, टुव्हीलरना टोल माफी असेल तर मनसेचे सैनिक प्रत्येक टोलवर उभे राहून हा टोल आकारू देणार नाहीत. जर नाही झाले तर आम्ही सर्व टोलनाके जाळून टाकू, असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तुम्ही माघार का घेतली? आताच्या सरकारवर दबाव आहे का? कोणाच्या उत्पन्नाचे साधन आहे का? याची उत्तरे मला पुढील दोन-तीन दिवसांत मिळतील. हे पैसे राज्य सरकारने घेतलेत का? जर घेतले असतील तर लोकांना चांगले रस्ते का मिळत नाहीत, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.