मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:35 PM2020-01-27T22:35:49+5:302020-01-27T22:39:56+5:30

पक्षाच्या बैठकीत राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल पदाधिकाऱ्यांचे सवाल

mns workers raises questions about party chief raj thackerays stand about nrc caa | मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती

मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती

Next

मुंबई: गेल्याच आठवड्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोदणीच्या बाजूनं भूमिका घेतली. मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेवर त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपली नेमकी भूमिका काय? आपण सीएए-एनआरसीला पाठिंबा देऊन भाजपासोबत जाणार का? मग विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात घेतलेल्या भूमिकेचं काय?, अशा प्रश्नांची सरबत्ती पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. राज ठाकरे अवघ्या १० मिनिटांत बैठकीतून निघून गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी हे प्रश्न उपस्थित केले. 

आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात बैठक झाली. शॅडो कॅबिनेट आणि ९ फेब्रुवारी सीएए-एनआरसी समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा याबद्दल बैठकीत चर्चा होणार होती. मात्र अध्यक्ष राज ठाकरे बैठकीला उशिरा पोहोचले. बैठक सुरू होताच ते केवळ १० मिनिटांत निघून गेले. 

राज ठाकरे सभागृहातून निघून गेल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे त्यांची मतं मांडली. आपली भाजपाबद्दलची यापुढची भूमिका काय असणार?, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाला आपण कडाडून विरोध केला. त्याच भाजपासोबत आपण जाणार आहोत का?, सीएए, एनआरसीबाबत आपली नेमकी भूमिका काय?, मनसे या कायद्याच्या तसंच केंद्र सरकारनं यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या बाजूनं असणार का?, असा प्रश्नांचा भडिमार पदाधिकाऱ्यांनी केला.

आपण यापूर्वी भाजपाला कडाडून विरोध केलेला असताना आता अचानक भाजपाच्या समर्थनार्थ जाणार असू तर आपण लोकांसमोर काय युक्तिवाद करणार आहोत, असाही मुद्दा काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. यामध्ये मुख्यत्वे कल्याण-डोंबिवली व मुंबईतील काही पदाधिकारी आक्रमक होते. मात्र याबद्दल मनसे नेते बाळा नांदगावकर यांना याबाबत स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे उद्या कृष्णकुंजवर बैठक होणार असून कदाचित राज ठाकरे हे स्वतः पदाधिकाऱ्यांच्या विधानांवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: mns workers raises questions about party chief raj thackerays stand about nrc caa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.