...अन्यथा राज साहेब उशीर होईल !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 02:24 PM2019-09-05T14:24:43+5:302019-09-05T14:24:57+5:30
स्व:ताच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मनसे कार्यकर्ते पर्याय शोधण्याचा निर्णय घेऊ शकतात
मोसिन शेख
मुंबई - लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने, मनसे पदाधिकारी आणि विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षातील नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्वता:च अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मनसे कार्यकर्ते पर्याय शोधण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा पाहायला मिळत असून, याची सुरवात औरंगाबाद पासून सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा राज ठाकरे यांची झाली असली तरीही मात्र या निवडणुकीत त्यांनी उमेदवार न दिल्याने मनसेला एकही खासदार निवडून आणता आला नाही. त्यानंतर राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा पाहायला मिळत होती. मात्र आचारसंहिता लागायला अवघ्या एक महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असताना सुद्धा, राज यांची भूमिका अजूनही स्पष्ट होऊ न शकल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
अन्य पक्षाप्रमाणे मनसेमधून सुद्धा अनेकजण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर अनेक ठिकाणी मनसे नेतेमंडळीकडून तशी तयारी सुद्धा सुरु आहे. मात्र पक्षाची भूमिका काय असणार आहे, याचा खुलासा होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे अनेकजण पर्यायाच्या शोधात असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मनसेचे पदाधिकारी पर्याय शोधत असल्याचे बोलले जात आहे.
त्यातच नुकतेच औरंगाबादमध्ये जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी पदाचा राजीनामा दिला असून, त्यापाठोपाठ आता अजूनही काही पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याचा तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वेळीच राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर पक्षातील नेते स्वता:चा अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी पर्याय शोधतील अशी चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे 'राज साहेब लवकर निर्णय घ्या अन्यथा उशीर होईल', अशी भावना मनसेचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.