मनसेत नवे गडी...
By admin | Published: July 9, 2017 01:03 AM2017-07-09T01:03:25+5:302017-07-09T01:03:25+5:30
लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या रिंगणात अपेक्षित यश प्राप्त झाले नसल्याच्या कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या रिंगणात अपेक्षित यश प्राप्त झाले नसल्याच्या कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेतला आहे. पक्षाला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीतून जुन्या चेहऱ्यांना वगळत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. २०१९च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत कार्यकारिणीत बदल करण्यात आले असून, नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले चेहरे पक्षाची मरगळ झटकणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
मनसेच्या कार्यकारिणीतून बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आणि संदीप दळवी यांना वगळण्यात आले आहे. हे चारही जण राज यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. मात्र या चारही जणांना वगळत कार्यकारिणीमध्ये माजी नगरसेवक संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, संजय नाईक आणि नंदू चिले यांना स्थान देण्यात आले आहे. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दादर येथील जबाबदारी यशवंत किल्लेदार यांना देण्यात आली आहे. भायखळा संजय नाईक यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. शिवडीची जबाबदारी नंदू चिले यांच्यावर सोपविण्यात येणार असून, अंधेरी पूर्वची जबाबदारी रोहन सावंत यांना देण्यात आली आहे; तसेच भांडुपची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात येत आहे.