बाळा नांदगावकरांच्या मूक संवादाने मनसेत कुजबुज
By admin | Published: January 16, 2015 06:05 AM2015-01-16T06:05:04+5:302015-01-16T06:05:04+5:30
मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या फेसबुकवरील पोस्टमुळे पक्षात वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई : मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या फेसबुकवरील पोस्टमुळे पक्षात वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनास नांदगावकर यांनी एकट्याने भेट दिली व त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासोबत काढलेला फोटो फेसबुकवर पोस्ट करून त्यांच्याशी मूक संवाद साधल्याचे म्हटले आहे!
नांदगावकर हे विधानसभेतील मनसेचे गटनेते होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून मनसेतील त्यांचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत नांदगावकर हे राज यांच्यासोबत दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची मागणी केली तेव्हा नांदगावकर यांच्याऐवजी अभिजित पानसे हे राज यांच्यासोबत होते. विधानसभेत गटनेते असताना विषय टोलचा असो की मराठी अस्मितेचा राज यांच्या शिष्टमंडळात त्यांच्यासोबत नांदगावकर हे उपस्थित असत. राज यांनी उद्धव यांच्या छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली तेव्हाही नांदगावकर त्यांच्या सोबत नव्हते. नंतर नांदगावकर एकटे प्रदर्शनास भेट देऊन आले. तेथे त्यांनी बाळासाहेबांच्या छायाचित्रांसोबत फोटो काढले आणि तेच फेसबुकवर पोस्ट केले. ‘बाळासाहेबांशी मूकसंवाद’ अशी फोटोओळही त्यास जोडली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसे नेत्यांच्या झालेल्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी पक्षाच्या प्रचार धोरणावर टीका केली होती. यामुळे नांदगावकर व दरेकर यांच्यात खटका उडाला होता. त्यानंतर दरेकर हे पक्षापासून दुरावले. वसंत गीते यांच्या मनाविरुद्ध नाशिकमध्ये नियुक्त्या केल्याने ते दुखावले. यामुळे दरेकर व गीते यांनी मनसेला रामराम करून भाजपात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांच्या या पोस्टने मनसेत त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. (विशेष प्रतिनिधी)