उल्हासनगरात मनसेची अस्तित्वाची लढाई

By admin | Published: January 17, 2017 04:34 AM2017-01-17T04:34:29+5:302017-01-17T04:34:29+5:30

मनसेला खाते उघडून देणारे शहर असा जरी उल्हासनगरचा उल्लेख होत असला

MNS's battle of existence in Ulhasnagar | उल्हासनगरात मनसेची अस्तित्वाची लढाई

उल्हासनगरात मनसेची अस्तित्वाची लढाई

Next


उल्हासनगर : मनसेला खाते उघडून देणारे शहर असा जरी उल्हासनगरचा उल्लेख होत असला; तरी पक्षप्रमुखांनी केलेले दुर्लक्ष, संघटनेत आलेली मरगळ यामुळे या निवडणुकीत पक्ष जीवंत ठेवायचा असेल, त्यात धुगधुगी हवी असेल तर राज ठाकरे यांनीच सभा घेत पक्षाला एकत्र आणण्याची गरज आहे, असे मनसैनिकांचे म्हणणे आहे. त्यातही ओमी कलानी यांच्या टीमसोबत गेल्यास पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळू शकतात, असे
काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याने नेमका काय निर्णय होतो यावरच पक्षाचे भवितव्य:अस्तित्त्व अवलंबून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही मनसेने शहरात विरोधी पक्षाची भूमिका वठविल्याने पक्षाबद्दल आकर्षण कायम आहे. त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी नेमके कोणते निर्णय घेतले जातात, यावर पक्षाचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर पक्षाला पहिले खाते उल्हासनगरने उघडून दिले. २००७ ला महापालिका निवडणुकीत मनसेच्या जयश्री पाटील यांनी तो मान मिळवला. पण पक्षाला पहिला विजय देणाऱ्या या शहराकडे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कायमच दुर्लक्ष केले. त्यांनी आजवर येथे एकही सभा गेतली नाही की शहराला भेट दिली नाही. त्यामुळे मनसेविषयी सुरूवातीला जे वातावरण व आकर्षण निर्माण झाले, ते कालांतराने राहिले नाही.
महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत पक्षाचे जयश्री पाटील व रवींद्र दवणे निवडून आले. तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष अ‍ँड. संभाजी पाटील यांनी पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी
निर्माण केली. विधानसभेच्या निवडणुकीत ११ हजारांपेक्षा जास्त
मते घेवून पक्षाची ताकद
दाखवून दिली. शिवसेनेला मनसेच्या रूपाने पर्याय मिळाला, अशा चर्चेला उधाण आले. दरम्यानच्या काळात संभाजी पाटील यांचा मृत्यू झाला व मनसेची ताकद कमी कमी होत गेली. २०१२ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी जयश्री पाटील यांनी साई पक्षात प्रवेश केला. निवडणुकीत पक्षाचे एकमेव रवींद्र दवणे पुन्हा नगरसेवक झाले.
दवणे यांनी पक्षाची भूमिका प्रखरपणे पालिकेत मांडली नसल्याने त्यांचे अनेकदा मनसैनिकांसोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देऊन विविध समित्यांचे सभापतीपद भूषविले. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला.
महापालिका निवडणुकीत पक्षाला नवसंजीवनी द्या, असे साकडे मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांच्याकडे पुन्हा घातले आहेत. कल्याण-डोंबविली येथील लहान-सहान कार्यक्रमाला हजेरी लावणारे राज ठाकरे उल्हासनगरात का येत नाही, असाही त्यांचा सवाल आहे. त्यांना या शहराचेच वावडे असेल, तर
पक्षाचे उमेदवार उभेच करू नका? असाही मतप्रवाह शहरात आहे. पक्षश्रेष्ठींकडून दुर्लक्ष झाल्यानेच नगरसेवक दवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सैनिक विविध पक्षात डेरेदाखल झाल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
>मनसेनेच वठवली विरोधकांची भूमिका
निवडून आलेल्या सदस्यापेक्षा पक्षसंघटनेनेच सताधाऱ्यांसह पालिका प्रशासनावर अंकुश ठेवला. आंदोलने, उपोषण, रस्ता रोको आदींचे हत्यार उपसून कामचुकारांवर शाई फेकून, प्रसंगी अधिकाऱ्यांना मारहाण करून विरोध नोंदविला. पक्ष चर्चेत आला.
नागरिकांसाठी विविध कार्यक्रम राबविले. एलबीटीमधील कोट्यवधींच्या घोटाळयाची चौकशी लावली आहे. पालिका शिक्षण मंडळातील सावळागोंधळ उघड करून शाळेच्या पुर्नंबांधणीचा प्रश्न धसास लावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त त्यांच्या नावाने अद्ययावत अभ्यासिकेचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. तसेच पाच कोटीच्या विशेष निधीतून अभ्यासिकेचे काम सुरू झाले. विद्यार्थ्याच्या फी वाढीपासून ते शिष्यवृत्तीच्या अनेक समस्या सोडनल्या आहेत.
>मनसेमुळे शिवसेना उमेदवाराला धोका
शहरातील लालचक्की, तानाजीनगर, शांतीनगर, शहाड गावठण भागात मनसेचा प्र्रभाव आहे. ओमी कालानी टीमसोबत त्यांची युतीची चर्चा सुरू आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या रिेंगणात युतीचा चेंडू असून ती झाल्यास सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेतील बंडखोरीचा लाभ उठवण्यात, तसेच गेल्या दशभराच्या सत्तेत महायुतीने काहीही काम न केल्याचा मुद्दा पटवून देण्यात मनसे यशस्वी झाल्यास त्यांच्या यशाची शक्यता वाढण्याची चिन्हे पदाधिकाऱ्यांना दिसतात.

Web Title: MNS's battle of existence in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.