अक्षय तृतीयेला  मनसेची महाआरती! राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:41 AM2022-04-20T11:41:05+5:302022-04-20T11:41:35+5:30

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा, तर ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी अलीकडेच आपल्या पुणे दौऱ्यात केली होती.

MNS's Maha Aarti on Akshaya Tritiya! Raj Thackeray's orders to the workers | अक्षय तृतीयेला  मनसेची महाआरती! राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

अक्षय तृतीयेला  मनसेची महाआरती! राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

Next

मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३ मे रोजी राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंगळवारी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच, राज यांच्या अयोध्या दौऱ्यात जास्तीत जास्त कार्यकर्ते सहभागी होतील यादृष्टीने अचूक नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा, तर ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी अलीकडेच आपल्या पुणे दौऱ्यात केली होती. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीसाठी मनसेचे नेते आणि शहराध्यक्षांची विशेष बैठक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, १ मे रोजी औरंगाबाद येथील सभा आणि ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याबाबत बैठक होती. त्यात सविस्तर चर्चा झाली आहे. अयोध्या दौऱ्यासाठी मनसेच्या पथकाने आढावा घेतला होता. आता आणखी एक पथक तेथे जाऊन तयारीचा आढावा घेईल. हा दौरा इव्हेंट नाही, तर आम्ही रामलल्लाचे दर्शन घ्यायला जात आहोत, असे नांदगावकर म्हणाले.

भोंग्यांसाठी पोलिसांची भेट
मुंबईसह राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी मनसेच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी अपर पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या मशिदींवर ३ मे पर्यंत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर भोंग्यांमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत या कारवाईची मागणी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात यशवंत किल्लेदार, अनिल येवले, अनंत कांबळे यांच्यासह विभाग अध्यक्षांचा समावेश होता.
 

Web Title: MNS's Maha Aarti on Akshaya Tritiya! Raj Thackeray's orders to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.