मनसेची नवी टॅगलाईन! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 01:49 PM2022-11-25T13:49:42+5:302022-11-25T13:50:07+5:30
येत्या २७ नोव्हेंबरला गोरेगावच्या नेस्को इथं मुंबईतील गटाध्यक्ष मेळावा घेत आहेत.
मुंबई - येत्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, पुणे महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही दिवसांपासून बैठकांची मालिका सुरू ठेवली आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मुंबईत पहिलं भाषण होत आहे.
येत्या २७ नोव्हेंबरला गोरेगावच्या नेस्को इथं मुंबईतील गटाध्यक्ष मेळावा घेत आहेत. दुपारी ४ वाजता याठिकाणी मनसे कार्यकर्ते जमतील. या गटाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर भाष्य करत मनसेच्या ट्विटर हँडलवरून या मेळाव्याचा पहिला टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला आहे अशी जनभावना आहे असं कॅप्शन देण्यात आले आहे. त्यानंतर चला, हे चित्र बदलूया आपण महाराष्ट्राला पर्याय देऊ या अशी साद घालण्यात आली आहे. या टीझरमध्ये "चला, पुन्हा नव्याने स्वप्न नवे पाहूया, नवमहाराष्ट्र घडवूया" अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पर्याय द्यायला तयार आहे...! pic.twitter.com/BrFADsrEHN
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 25, 2022
राज ठाकरे कोल्हापूरमार्गे कोकण दौऱ्यावर
मनसे गटाध्यक्ष मेळाव्यानंतर राज ठाकरे हे २९ नोव्हेंबरला कोल्हापूरमार्गे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. २९-३० रोजी राज ठाकरे कोल्हापूरात अंबाबाईचं दर्शन घेत पदाधिकारी बैठक घेणार आहेत. त्यानंतर १ तारखेला कुडाळमध्ये सावंतवाडी, दोडा मार्ग येथे पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. मुक्कामाला मालवण येथे जाणार असून २ डिसेंबरला आंगणेवाडी येथे भराडीदेवीचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर कणकवलीत मान्यवरांच्या भेटीगाठी घेत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तिथून पुढचा मुक्काम रत्नागिरीत असेल. राजापूर येथे ते मनसे कार्यालयाचं उद्धाटन करतील. इथं २०० महिला कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. लांजा येथील तालुका पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ते रत्नागिरीत विविध ठिकाणी पक्ष कार्यालयाचं उद्धाटन करणार आहेत.
२९ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ ह्या दरम्यान राजसाहेब कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे. pic.twitter.com/26zNqOsqae
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 24, 2022
५ डिसेंबरला राज ठाकरेंनी गुहागर तालुका कार्यालयाचं उद्धाटन करत चिपळूण येथे विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक लावली आहे. त्यानंतर खेड तालुका पदाधिकारी बैठक, दापोली-मंडणगड पदाधिकारी बैठक असा राज ठाकरेंचा दौरा नियोजित करण्यात आला आहे. नुकतेच मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी तरुणांशी संवाद साधला. त्याचसोबत भाजपा आमदार नितेश राणे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे.