टिष्ट्वटरवर मनसेची ‘राज’कीय खेळी
By admin | Published: September 23, 2015 01:56 AM2015-09-23T01:56:33+5:302015-09-23T01:57:10+5:30
महापालिका क्षेत्रातील मतदारांची नाराजी ओढवून घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या ‘राज’कीय अस्तित्वाकरिता भावनिक खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे
मुंबई : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या व नाशिकपासून अनेक महापालिका क्षेत्रातील मतदारांची नाराजी ओढवून घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या ‘राज’कीय अस्तित्वाकरिता भावनिक खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे राज यांचे जुने फोटो पोस्ट केले आहेत.
मनसेच्या टिष्ट्वटर हँडलवरील फोटो पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पुण्यात असलेल्या राज यांना याबाबत पत्रकारांनी छेडले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
काही दिवसांपूर्वी उद्धव व राज यांच्या मनोमिलनाच्या बातम्या पेरण्यात आल्या. त्यानंतर लागलीच उद्धव यांनी पत्रक काढून त्याचा इन्कार केला तर राज यांनी ठाण्यातील पक्षाच्या कार्यक्रमात मनोमिलनाची शक्यता फेटाळली. उद्धव व राज यांच्या मनोमिलनाची त्यांच्या चाहत्यांना अनेक दिवसांपासून आस लागली आहे. सतीश वळंजु यांच्यासारख्यांनी तसे प्रयत्नही केले. मात्र उद्धव व राज यांच्या गोटातून राजकीय स्वार्थाकरिता मनोमिलनाच्या पुड्या सोडून ‘लांडगा आला रे आला’ अशी आवई दिली जाते.
मनसेची तोळामासा राजकीय अवस्था लक्षात घेता या वेळी ही आवई मनसेच्या गोटातून दिली आहे. कल्याण-डोंबिवली निवडणुकीत या आवईमुळे काही राजकीय फायदा होत असेल तर व्हावा या हेतूने मनसेकडून हा उद्योग केला गेला आहे, असे कळते. यापूर्वी शिवसेनेची परिस्थिती गंभीर असताना व मनसे शिवसेनेची मते खात असताना टाळीकरिता हात पुढे करून उद्धव यांनी मनोमिलनाची आवई उठवली होती. (विशेष प्रतिनिधी)