Maharashtra Political Crisis : शिंदे गटाबाबत मनसेचे ‘वेट ॲण्ड वॉच’; एकमेव आमदार म्हणतात, ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जवळीक शक्य’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:55 AM2022-06-28T10:55:33+5:302022-06-28T10:57:04+5:30
पक्षांतर कायद्यातील तरतुदींमुळे दोन तृतीयांश बहुमत असले तरी एकनाथ शिंंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी सुरुवातीला भाजपात हा गट विलीन केला जाणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला होता.
मुंबई/अलिबाग : शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मात्र सध्या कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर करण्यास नकार दिला आहे. पक्षाने ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली असल्याचे सांगताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आमच्यासोबत येत असतील तर जवळीक होऊ शकते. राज ठाकरे यांच्या तब्येतीबाबत शिंदे यांनी संपर्क केला असल्याची माहिती माध्यमांमधून कळली असल्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी अलिबाग येथे सांगितले.
पक्षांतर कायद्यातील तरतुदींमुळे दोन तृतीयांश बहुमत असले तरी एकनाथ शिंंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी सुरुवातीला भाजपात हा गट विलीन केला जाणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला होता. त्यानंतर बच्चू कडू यांच्या प्रहारचाही पर्याय चर्चेत आला होता. मात्र, हिंदुत्वाचा वारसा आणि ठाकरे ब्रॅण्ड यामुळे मनसेचा पर्याय तुलनेत अधिक उपयुक्त असल्याने विलीनीकरणाची वेळ आलीच तर मनसेचा पर्याय उत्तम असल्याचा तर्क मांडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त सोमवारी समोर आले. त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
या चर्चेवर मनसेने मात्र अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. मनसे सध्या ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात कुणीही प्रसारमाध्यमांशी बोलू नये, अशी स्पष्ट ताकीद पक्षाकडून देण्यात आल्याचे समजते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून घरी परतले आहेत. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी नेतेमंडळी आणि पदाधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना शिवतीर्थावरील वर्दळ वाढल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध - राजू पाटील
हिंदुत्व हा मुद्दा एकनाथ शिंदे गटाने प्रामुख्याने घेतला असून, राज ठाकरे यांनीही हा मुद्दा आधीपासून घेतलेला असून, तो आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे आमच्यासोबत येत असतील तर जवळीक होऊ शकते. मात्र, हा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेऊ शकतात, असे वक्तव्य मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले.
अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील प्रश्नांबाबत राजू पाटील, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे यांचा मनसेसोबत येण्याबाबतचा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.