मुले पळविण्याच्या अफवेतून जमावाने एकाला ठेचून मारले
By admin | Published: March 6, 2015 12:08 AM2015-03-06T00:08:48+5:302015-03-06T00:08:48+5:30
मुलांचे अपहरण करणारा असल्याच्या संशयावरून जमावाने एका मनोरुग्णाला बेदम मारहाण करीत ठार मारले, तर त्याआधी मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरीही ठार झाला.
कन्नड तालुक्यातील खळबळजनक घटना : मनोरुग्णाच्या हल्ल्यात शेतकरीही ठार; पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने नातेवाईक बचावले
हतनूर (जि. औरंगाबाद) : मुलांचे अपहरण करणारा असल्याच्या संशयावरून जमावाने एका मनोरुग्णाला बेदम मारहाण करीत ठार मारले, तर त्याआधी मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरीही ठार झाला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास कन्नड तालुक्यातील टापरगाव- रुईखेडा शिवारात घडली.
दत्तात्रय सखाराम पल्हाळ (३५, रा. बोडखा, ता. खुलताबाद) असे मनोरुग्णाचे आणि प्रकाश दौलतराव जंगले (५०, रा. टापरगाव, कन्नड) असे शेतकऱ्याचे नाव आहे. मनोरुग्णाला सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही जमावाने मारहाण केली. वेळीच पोलीस पोहोचल्याने त्यांचे जीव बचावले, हे विशेष.
जंगलेंचा घाटीत मृत्यू
मनोरुग्ण दत्तात्रय पल्हाळने डोक्यात लाकडी दांडा मारल्याने प्रकाश जंगले हेही गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जंगले यांचाही मृत्यू झाला.
बहीण, मेव्हण्यालाही मारहाण
मनोरुग्ण दत्तात्रय बेपत्ता झाल्यानंतर त्याची बहीण हिराबाई आडुळे, रामदास काटकर, मधुकर आडुळे, इस्माईल पटेल आदी दहा ते पंधरा नातेवाईक, मित्रमंडळी शोध घेत घेत अखेर टापरगावात पोहोचले. त्याचवेळी जमाव दत्तात्रयला मुले पळविणारा अपहरणकर्ता असल्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. आपल्याच दत्तात्रयला मारहाण होत असल्याचे नजरेस पडताच या नातेवाईक, मित्रमंडळींनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही मंडळीही अपहरणकर्त्यांच्या टोळीचेच सदस्य असल्याच्या संशयावरून जमावाने त्यांनाही मारहाण सुरू केली.