Exclusive: जमावाचा हिंसाचार सरकारच्या पाठिंब्याने; सहगल यांचं प्रस्तावित भाषण 'लोकमत'च्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 09:17 PM2019-01-06T21:17:59+5:302019-01-06T21:22:19+5:30

नयनतारा सहगल यांना दिलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांकडून रद्द करण्यात आले आहे.

mob lynching like incidents have support of government nayantara sahgal in his proposed speech for marathi sahitya sammelan | Exclusive: जमावाचा हिंसाचार सरकारच्या पाठिंब्याने; सहगल यांचं प्रस्तावित भाषण 'लोकमत'च्या हाती

Exclusive: जमावाचा हिंसाचार सरकारच्या पाठिंब्याने; सहगल यांचं प्रस्तावित भाषण 'लोकमत'च्या हाती

googlenewsNext

- प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : 'सरकारचा पाठिंबा असलेल्या जमावाचा हिंसाचार बचावहीन लोकांविरूद्ध अनेक ठिकाणी सुरू आहे आणि त्यातल्या दोषींना शिक्षा होत नाहीत. काही प्रसंगांमध्ये बळी पडलेल्या लोकांवरच गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही ठिकाणी गुन्हेगारांचे कौतुक झाले आहे. या दुःखदायक परिस्थितीची मोठी किंमत निष्पापांना मोजावी लागत आहे. अनेक भारतीयांच्या मनात भीती आणि दुःख दाटण्याचा काळ आता आला आहे', अशा परखड शब्दांत इंग्रजी साहित्यिक नयनतारा सेहगल यांनी आपल्या नियोजित भाषणातून सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

नयनतारा सहगल यांनी साहित्य संमेलनाला येऊ नये, असा मज्जाव करणारे पत्र आयोजकांनी ईमेलद्वारे त्यांना पाठवले. त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावर येऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल खुलेपणाने बोलल्यास आगामी निवडणुकांवर परिणाम होईल, अशा विचारातून राजकीय नेत्यांकडून आयोजकांवर दबाव टाकण्यात आला. सहगल संमेलनाला येणार नसल्या तरी आपले भाषण त्या आयोजकांकडे सुपूर्द करणार आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून या भाषणातील काही मुद्दे 'लोकमत'च्या प्रतिनिधीला मिळाले आहेत. या भाषणामध्ये सेहगल यांनी सरकारचे हिंसाचारा विरोधातील मवाळ धोरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर येणारी गदा, मॉब लिंचिंग, साहित्यिक, विचारवंतांच्या होणाऱ्या हत्या यावर खरमरीत टीका केली आहे.

भाषणात नमूद केल्यानुसार सेहगल म्हणतात, 'नुकतीच, देशाविरूद्ध कट करण्याचे खोटे आरोप करून, पाच नागरिकांना अटक झालेली आपण पाहिली आहे. आदिवासी आणि जंगलांच्या हक्कांकरता आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याकरता काम करण्यात आयुष्य वेचलेले हे स्त्री-पुरुष आहेत. कायदा हातात घेऊन जीवे मारणारे जमाव गोहत्या आणि गाईचे मांस खाण्यासंबंधीच्या कृत्रिम अफवांच्या आधारे उघडपणे मुस्लिमांवर हल्ले होत आहेत, त्यांना ठार मारत आहेत. आपण सगळे ही झुंडशाही टीव्हीवर पाहात आहोत. उत्तर प्रदेशात गोहत्येच्या नावाखाली या जमावांचे हल्ले सर्रास सुरू आहेत आणि सरकारी यंत्रणा बाजूला उभ्या राहून ते पाहात आहेत. या प्रकारचा दहशतवाद जेव्हा अधिकृत ठरतो, तेव्हा आपण न्यायाकरता कुणाच्या तोंडाकडे पाहायचे?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सेहगल पुढे म्हणतात, 'आपण सर्व लेखक असल्यामुळे, सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये आपल्या लेखक आणि कलावंत भाईबंदांच्या बाबतीत काय घडते आहे त्याकडे लक्ष देऊ या. प्रश्न विचारणारे मन, सृजनात्मक कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांना सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये काहीही स्थान नाही हे आपण पाहतोच आहोत आणि जिथे विचारस्वातंत्र्य किंवा लोकशाही हक्कांप्रती आदर नसतो, तिथे लेखन ही एक धाडसी, धोकादायक कृती बनते. जगभरातल्या हुकूमशाही राजवटींमध्ये नेहमी असेच घडत आले आहे. तिथे कला ही सरकारी नियंत्रणाखाली ठेवली जाते आणि लेखकांनी जर त्यांच्या लक्ष्मणरेषेच्या बाहेर पाऊल टाकले, तर त्यांना शिक्षा होण्याची किंवा छळ होण्याची भीती असते.' 

'लेखकांवर अज्ञानमूलक टीकेची आगपाखड आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्टी सोसण्याचे प्रसंग येत आहेत. महाराष्ट्रातले तीन प्रमुख बुद्धिप्रामाण्यवादी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांना तर्कबुद्धीची कास धरून अंधश्रद्धांना नकार दिल्याबद्दल गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि बंगळुरूमध्ये स्वतंत्र विचार आणि हिंदुत्वाला विरोध असल्यामुळे गौरी लंकेशला ठार मारण्यात आले. आणखी काहींना ठार मारण्याच्या धमक्या देऊन लिहिण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे. ‘अमुक दृश्यामधले संवाद बदला आणि तमुक दृश्य काढून टाका, अन्यथा आम्ही तुमचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही आणि तरीही तुम्ही तो प्रदर्शित केला, तर आम्ही सिनेमागृहाची तोडफोड करू. आमच्या भावना दुखावतील असे काही करू नका.’ निराळ्या शब्दांत, ‘आम्ही सांगू तसे करा अन्यथा तुमचे जीवन आणि तुमची कला सुरक्षित राहणार नाही.’ पण सर्जनात्मक कल्पनाशक्ती सरकार किंवा जमावाकडून आदेश स्वीकारू शकत नाही. आणि हे भावना दुखावणे वगैरे अर्थातच निव्वळ निरर्थक आहे', आशा शब्दांत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

आपण साहित्यिक अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो? या प्रश्नाचे उत्तर आहे – आपण लिहू शकतो. सशक्त काल्पनिक वाङमय त्याच्या लेखकांनी विवादामध्ये उडी घेऊन कुठली तरी बाजू उचलून धरण्यातून निर्माण होत आले आहे. 'आपला देश एका दुविधेत सापडला आहे. आपण कुठला मार्ग निवडावा – स्वातंत्र्याकडे की स्वातंत्र्यापासून दूर – ही गोष्ट इतर अनेक गोष्टींबरोबरच आपण काय लिहितो यावर आणि आपल्याला गप्प राहण्यास भाग पाडणाऱ्यांपुढे मान तुकवण्याचे नाकारण्यावर अवलंबून असेल. ज्यांच्या हत्या झाल्या आहेत त्यांचे स्मरण करून, वेगळे मत मांडण्याच्या हक्काकरता उभे राहणाऱ्यांना पाठिंबा देऊन आणि भय व अनिश्चिततेच्या छायेत जगणाऱ्या, पण तरीही आपले मत व्यक्त करणाऱ्या, विरोधी मत असलेल्या सर्वांकरता, आपण स्वातंत्र्याचा मार्ग निवडू या', असा आशावाद नयनतारा सेहगल सरतेशेवटी व्यक्त करतात.
 

Web Title: mob lynching like incidents have support of government nayantara sahgal in his proposed speech for marathi sahitya sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.