महावितरणकडून ग्राहकांसाठी मोबाईल अॅप
By Admin | Published: December 26, 2016 01:59 AM2016-12-26T01:59:54+5:302016-12-26T01:59:54+5:30
वीजबिल संदर्भात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधीकधी वीजबिल मिळत नाही.
भूगाव : वीजबिल संदर्भात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधीकधी वीजबिल मिळत नाही. मुदत संपल्यावर बिल येते. वीजबिल भरायचे लक्षात राहत नाही आदी समस्यांवर महावितरण कंपनीने उपाय शोधला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी नवीन एसएमएस व मोबाईल अॅप सेवा सुरू केली आहे.
मुळशी उपविभागामधे मुळशी, माणगाव, वेल्हा, हवेली हे तालुके येतात. यात सुमारे घरगुती, व्यापारी व औद्योगिक याचे ४९ हजार ५०० तर कृषिपंपाचे ३ हजार ५०० असे एकूण ५३ हजार ग्राहक आहेत. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून, विभागात आतापर्यंत एकूण ग्राहकांपैकी २४ हजार ८०० म्हणजेच जवळपास ४७ टक्के ग्राहकांनी नोंदणी केली आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे महावितरण कर्मचाऱ्यांना मिटर रिडींग घेणे, वीजबिल वाटप करणे जमत नाही. यामुळे बिले वेळेत भरली जात नाहीत, अशा अनेक कारणांमुळे अनेक वेळा दंड किंवा वीज कनेक्शन तोडली जाते. त्यामुळे अनेक ग्राहक हैराण होत होते. ही समस्या लक्षात घेऊन महावितरण कंपनीने रिडींग पाठवण्याची सुविधा केल्यामुळे विजबिलात कधीच चूक होणार नाही. वीजबील दुरुस्तीसाठी वारंवार कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही.
ग्राहकांना घरबसल्या माहिती आपल्या मोबाईलवर मिळेल.
या दोन्ही सेवेतून ग्राहकांना वीजबिल तयार झाले की बिलाची रक्कम, बिल भरण्याची अंतिम मुदत, मागील थकीत रक्कम असेल तर त्यांच्या माहितीचा मेसेज येणार असून बिल भरण्यासाठी एसएमएसद्वारे कळवण्यात येईल.
याचबरोबर तांत्रिक बिघाड, दुरुस्ती यासाठी वीजपुरवठा किती वेळ खंडित राहिल, हा पुरवठा कधी पूर्ववत होईल या संदर्भात माहितीसुद्धा दिली जाईल. यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांना या काळातील कामांचे व शेतीला पाणी देण्याचे नियोजन किंवा यावर पर्यायी व्यवस्था करता येईल.
वीज ग्राहकांच्या मोबाईलची नोंदणीची मोहीम सुरू झाली असून मुळशी उपविभागात ५८ टक्के ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाली आहे. उर्वरित ग्राहकांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी मोबाइल अॅपद्वारे, एसएमएसद्वारे,अथवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करावा. वीजबिलाच्या मागे याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे.
- फुलचंद फड, उपकार्यकारी अभियंता, मुळशी
महावितरण अॅप :
महावितरण कंपनीने मोबाईलसाठी ‘महावितरण’ अॅप सुरू केले आहे. या अॅपवर मीटर रिडींग पाठवण्याची सुविधा, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज नोंदणी, वीजबिलाचा तपशील तसेच वीजबिल भरण्याची सुविधा, वीजेसंबंधी तक्रार, नोंदणी आणि तक्रारींचा पाठपुरवठाही या अॅपवर करण्यात येईल. हे अॅप मराठी व इंग्रजी भाषेतून उपलब्ध आहे. अँड्रॉईड, आयओएस, विंडोज अॅप्लीकेशनवरून हे मोबाईल अॅप डाऊनलोड करावे.