बारावी परीक्षेच्या केंद्रावर माेबाईल बंदी ; केंद्रचालकांनाही नेता येणार नाही माेबाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 01:47 PM2019-02-20T13:47:43+5:302019-02-20T13:49:40+5:30
वॉटसआपवरून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी यंदापासून केंद्रचालकांपासून शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदी कोणासही परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाता येणार नाही
पुणे : वॉटसआपवरून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी यंदापासून केंद्रचालकांपासून शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदी कोणासही परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाता येणार नाही अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. उद्यापासून (गुरुवार, २१ फेब्रुवारी) बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे.
बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना मोबाईल आणता येणार नाही. त्याचबरोबर शिक्षकांकडील मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करावे लागतील. एका दिव्यांग विद्यार्थिनीला वैद्यकीय कारणास्तव आयपॅडवर परीक्षा देण्याची सवलत देण्यात आली आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत ९ भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले व छपाई केलेलेच वेळापत्रक ग्राह्य धरावे असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापुर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ मंडळामार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत परीक्षा होणार आहे.या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी नोंदणी झाली आहे.यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ १५१ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. यामध्ये कला,वाणिज्य,विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात एकूण ९७७१ कनिष्ठ महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात २९५७ परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसा़यनशास्त्र , जीवशास्त्र, गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.