नव्या वर्षापासून पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मोबाईल बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:15 PM2019-12-10T12:15:27+5:302019-12-10T12:17:53+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय; संत नामदेव पायरी होणार आता चांदीची
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारासमोर असलेली नामदेव पायरी चांदीची करण्यासाठी मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.सुरक्षतेच्या दृष्टीने ०१ जानेवारी २०२० पासून मंदिरात मोबाईल बंदी करण्याचे ठरले. याचबरोबर श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या आॅनलाईन बुकिंग दर्शन पाससाठी १०० रुपयांचे शुल्क आकारण्याबाबतही चर्चा झाली मात्र यावर मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी अन्य महारजांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका घेतली.
श्री संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, यात महाद्वार परिसर देखील आकर्षक करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर होते.
यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
यापूर्वीही मंदिर समितीच्या बैठकीमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आॅनलाईन बुकिंग करून पास घेऊन येणाºया भाविकाला १०० रुपये कर आकारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाला मंदिर समितीचे तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी नापसंती दिली. यामुळे हा विषय स्थगित ठेवण्यात आला होता.
परंतु सदस्य संभाजी शिंदे यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत हा विषय प्राधान्याने मांडला. शिंदे बैठकीत म्हणाले, रोज तीन हजारांच्या आसपास भाविक दर्शनासाठी आॅनलाईन बुकिंग पास घेतात. आॅनलाईन बुकिंग पासला शुल्क आकारल्यास मंदिर समितीला वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळेल. त्यातून भाविकांसाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील. यंदा गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी आॅनलाईन पाससाठी शुल्क आकारण्यासाठी विरोध केला आहे. इतर महाराज मंडळींशी त्याबाबत चर्चा करून निर्णय देऊ, असे त्यांनी सांगितले.
नव्या वर्षापासून मंदिरात मोबाईल बंदी
- - मंदिराच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसाठी आऊटसोर्सिंग पध्दतीने ३४ सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यास व सुरक्षतेच्या दृष्टीने ०१ जानेवारी २०२० पासून मंदिरात मोबाईल बंदी करण्याचे ठरले.
- पंच्चावन्न लाख रुपयांची चिल्लर मंदिर समितीकडे दानपेटीतून प्राप्त झालेली नाणी कोणतीही बॅक घेण्यास तयार नसल्याने, मंदिर समितीकडे अंदाजे ५५ लक्ष रूपयांची नाणी पडून आहेत. ही नाणी एच.डी.एफ.सी. बँकने घेण्याची तयारी दर्शविल्याने, सदर बॅकेत खाते उघडून नाणी मुदत ठेवी स्वरूपात जमा करण्यास मंजुरी देण्यात आली.
- भजन, कीर्तनासाठी स्पीकर बंदी - श्री. विठ्ठल सभामंडप व श्री. रूक्मिणी सभामंडप येथे मंदिर समितीचे कार्यक्रम वगळून सप्ताह, भजन, किर्तन व इतर कार्यक्रमासाठी स्पिकर बंदी करण्याचे ठरले.
मंदिर समिती करणार ५ लाखांची मदत
- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळा आळंदीकडे निघाला होता. या दरम्यान पालखी सोहळ्यातील सोपान महाराज नामदास यांचा अपघात झाला होता. यावेळी नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास व अतुल महाराज आळशी यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या दोघांच्या कुटुंबीयांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मदत करणार असल्याचे सहायक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.