नक्षलग्रस्त भागात मोबाइल नेटवर्कचे जाळे
By admin | Published: November 8, 2016 04:44 AM2016-11-08T04:44:10+5:302016-11-08T04:44:10+5:30
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात मोबाइल टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला केंद्राकडून मिळालेल्या विशेष निधीतून ३७ नवीन टॉवर उभारण्यात आले आहेत
दिगांबर जवादे, गडचिरोली
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात मोबाइल टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला केंद्राकडून मिळालेल्या विशेष निधीतून ३७ नवीन टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच आणखी पाच टॉवरच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोबाइल नेटवर्कचे जाळे निर्माण झाले असून नक्षली चळवळीला पायबंद घालण्यासाठी त्याची मोठी मदत मिळणार आहे.
शहरी भागात टॉवर उभारण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या मोबाइल कंपन्या दुर्गम व जंगलव्याप्त भागात मात्र टॉवर उभारण्यास तयार होत नाहीत. या भागात संपर्काचे साधन नसल्याने याचा लाभ नक्षल्यांना मिळत होता. पोलिसांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने नक्षल कॉरिडॉर भागात मोबाइल टॉवरचे जाळे निर्माण करण्याची योजना हाती घेतली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत ३७ नवीन टॉवर उभारण्यात आले. बीएसएनएलचे जिल्हाभरात आता एकूण १७० टॉवर बांधण्यात आले आहेत. या नवीन टॉवरमुळे ग्रामीण व दुर्गम भागात मोबाइल नेटवर्कचे जाळे निर्माण झाले आहे. त्याचा फायदा सशस्त्र दलांना नक्षलींविरोधात कारवाया करताना होणार आहे.