मॉकड्रीलने उडाली ठाणेकरांत घबराट
By admin | Published: June 9, 2017 03:19 AM2017-06-09T03:19:00+5:302017-06-09T03:19:00+5:30
अतिरेकी कारवाया तसेच कोणतीही एखादी अनुचित घटना घडल्यास स्थानिक पोलीस आणि फोर्स-१ या कमांडोंची कशी तयारी आहे?
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अतिरेकी कारवाया तसेच कोणतीही एखादी अनुचित घटना घडल्यास स्थानिक पोलीस आणि फोर्स-१ या कमांडोंची कशी तयारी आहे? त्यांचा प्रतिसाद किती वेळेत कशाप्रकारे मिळतो, याची चाचपणी घेण्यासाठी ठाण्यातील एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंत रंगीत तालीम (मॉकड्रील) घेतले. अर्थात, या मॉकड्रीलची काहीच माहिती नसल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र चांगलीच घबराट पसरली होती.
जागतिक पातळीवर ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता ठाण्यातही अशी एखादी घटना घडलीच, तर पोलिसांच्या तयारीची चाचपणी मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी घेतली. भारतासह जगभरात ज्यू धर्मीयांच्या धार्मिकस्थळी बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रील घेण्यात आले. सिनेगॉगजवळ अतिरेक्यांसारखे काही लोक शिरले असून त्यांच्याजवळ शस्त्रेही आहेत, अशी माहिती फोर्स-१च्या कमांडोंना मिळाली. हीच माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून ठाणेनगर, नौपाडा, राबोडी आणि कळवा या स्थानिक पोलीस ठाण्यांनाही मिळाली. साधारण बुधवारी रात्री ११.३० वा. मिळालेल्या या माहितीच्या आधारे अवघ्या काही मिनिटांमध्येच फोर्स-१ चे २० ते २५ कमांडो तसेच स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण परिसराला वेढा दिला. सिनेगॉग आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. काय घडले? कशामुळे रस्ते बंद केले? याची काहीच कल्पना नसल्यामुळे सिव्हील हॉस्पिटल परिसरात गोळीबार झाल्याचे वृत्त शहरभर पसरले. काहींनी शहरात अतिरेकी आल्याच्याही बातम्या सोशल मीडियाद्वारे पसरवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत ‘मिशन सिनेगॉग’ सुरू झाले होते. अनेकांनी नेमके काय घडले, हे पाहण्यासाठी या ठिकाणी धाव घेतली. पण, पोलिसांनी आपली शस्त्रे रोखून अन्य मार्गांनी जाण्यास लोकांना सांगितले. गुरुवारी पहाटे २.३० वा.पर्यंत ही रंगीत तालीम सुरू होती. अखेर २.३० वा.च्या सुमारास या भागातून पोलिसांनीही चार सशस्त्र अतिरेक्यांना (बनावट) ताब्यात घेतले. त्यानंतर, ही मोहीम फत्ते झाली. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी आणि मुख्यालयाचे उपायुक्त मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम पार पडली. अर्थात, खोपट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, उथळसर, चरई, कोलबाड, कॅसल मिल, सिद्धेश्वर तलाव आदी परिसरांतील नागरिकांमध्ये मात्र रात्रभर घबराटीचे वातावरण होते.