घोकंपट्टीचा अभ्यासक्रम बदलणार
By admin | Published: June 16, 2017 12:23 AM2017-06-16T00:23:37+5:302017-06-16T00:23:37+5:30
दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण मिळवल्याने राज्याच्या शिक्षणपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. ती योग्यच आहे. पण, नीट आणि जेईई परीक्षांचा निकाल
- लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण मिळवल्याने राज्याच्या शिक्षणपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. ती योग्यच आहे. पण, नीट आणि जेईई परीक्षांचा निकाल चांगला लागायला हवा असेल; तर सध्याचा घोकंपट्टीचा अभ्यासक्रम बदलणे अपेक्षित आहे. त्यासाठी दहावी व बारावीचा परीक्षा पॅटर्न बदलावा लागेल. तो बदलण्यापूर्वी अभ्यासक्रम बदलायला हवा. शिक्षणतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार तो २०१९मध्ये बदलला जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि राज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या प्रवेशोत्सवानिमित्त ते बोलत होते. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत गुरुवारी आयोजित शैक्षणिक कार्यक्रमात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाददेखील साधला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, महापौर राजेंद्र देवळेकर, शिक्षण सभापती वैजयंती घोलप, के.सी. गांधी विद्यालयाचे अध्यक्ष अशोक प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
नीट आणि जेईईच्या परीक्षांबाबत सरकारने न्यायालयात आपली बाजू योग्य प्रकारे मांडली होती, असे सांगून तावडे म्हणाले, शैक्षणिक बदल हा विजेचे बटण दाबावे, तसा होत नाही. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी आधी नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलावा लागेल. ही प्रक्रिया २०१८मध्ये होईल. त्यानंतर, २०१९मध्ये दहावी व बारावीचा अभ्यासक्रम बदलता येईल.