लक्षावधी भक्तांची राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली
By admin | Published: October 20, 2016 08:04 PM2016-10-20T20:04:33+5:302016-10-20T20:04:33+5:30
देशाच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने आलेल्या गुरुदेवभक्त व साधकांनी बुधवारी गुरूकुंज मोझरीत हजेरी लावली. सायंकाळी ४.५८ मिनिटांनी मोझरी परिसरात निरव शांतता पसरली
ऑनलाइन लोकमत
गुरुकुंज मोझरी, दि. २० : ‘तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो।’ अशी आर्त हाक दुर्लक्षित शेतकऱ्यांसाठी देऊन ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण करणारे ग्रामनाथ, खंजेरी भजनाच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जनमानसात जागृत करणारे राष्ट्रपुरुष, विश्वस्रेह का ध्यान धरे। सबका सब सन्मान करे।। असा विश्वबंधूत्वाचा संदेश देणारे युगपुरुष क्रांतीदर्शी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथीनिमित्त नैसर्गिक व वैयक्तिक दु:खे बाजूला सारून आपल्या गुरुमाऊलीला ‘मौन श्रद्धांजली’ अर्पण करण्यासाठी देशाच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने आलेल्या गुरुदेवभक्त व साधकांनी बुधवारी गुरूकुंज मोझरीत हजेरी लावली. सायंकाळी ४.५८ मिनिटांनी मोझरी परिसरात निरव शांतता पसरली. लाखो साश्रुनयानांनी राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन वद्य पंचमीला इंग्रजी पंचांगानुसार शुक्रवार, ११ आॅक्टोबर १९६८ साली सायंकाळी ४.५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून राष्ट्रसंतांना त्यांच्या विचारांचे पाईक असलेले सर्वधर्म पंथातील भक्त व साधक श्रद्धांजली अर्पण करतात. मागील ४७ वर्षांपासून अविरत हा उपक्रम निर्विघ्नपणे पार पडत आला आहे.