आचारसंहिता पथक भाजपा कार्यालयात

By admin | Published: February 9, 2017 05:16 AM2017-02-09T05:16:40+5:302017-02-09T05:16:40+5:30

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Model Code of Conduct at BJP office | आचारसंहिता पथक भाजपा कार्यालयात

आचारसंहिता पथक भाजपा कार्यालयात

Next

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भाजपामागे आता आचारसंहिता अंमलबजावणी विभागाच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. आचारसंहिता कक्षाचे भरारी पथक बुधवारी वसंत स्मृती या कार्यालयात जाताच भाजपाच्या काही नेत्यांनी त्यांना विरोध केला.
चौकशीचे लेखीपत्र नसल्याने पथकास विरोध केल्यानंतर अखेरीस अधिकाऱ्यांनी तशी नोंद केली आणि ते माघारी फिरले. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार यादीचा विषय गाजला. अनेकांनी तिकीट विक्री झाल्याचा आरोप केला. परंतु त्याचबरोबर भाजपा कार्यालयात उमेदवारांकडून दोन लाख रूपये गोळा केला जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची सारवासारव सुरू असताना भाजपाचे नेते गोपाळ पाटील यांनी तिकीटासाठी दहा लाख रूपये देऊनही उमेदवारी मिळत नसल्याचा आणखी एक व्हीडीओ व्हायरल झाल्या. त्याचे भाजपाने खंडन केले असले तरी त्यातून भाजपासाठी हा विषय डोकेदुखी ठरला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी निवडणूक विभागाच्या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथकाने मंगळवारी दुपारी चार वाजता अचानक धडक दिली. तेव्हा भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी रघुनाथ कुलकर्णी हे प्रभाग प्रभारींच्या बैठकीत मार्गदर्शन करत होते. भरारी पथकाचे प्रमुख शिवाजी काळे तसेच सुनील कदम, प्रमोद मांडवे तसेच दोन पोलीस कर्मचारी तसेच व्हीडीओग्राफर यांचे पथक दाखल होताच भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी तसेच आमदार अपूर्व हिरे यांनी पथकाला विरोध केला. पथकाने तिकीट विक्री प्रकरणात प्राथमिक माहिती घेण्यासाठी आल्याचे सांगितले. परंतु, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशीचे लेखी आदेश आहेत काय, अशी विचारणा करीत चौकशी पथकाला सहकार्य देण्यास असमर्थता दर्शवली.
निवडणूक आयोगाच्या लेखी पत्राला पक्षाकडून लेखी उत्तर दिले जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर चौकशी पथकाचे अधिकारी आल्यापावली माघारी परतले. प्रकरणाची लेखी स्वरूपात पत्र देऊन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख शिवाजी काळे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Model Code of Conduct at BJP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.