आचारसंहिता पथकाची भाजपा कार्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 09:49 PM2017-02-08T21:49:58+5:302017-02-08T21:49:58+5:30
तिकीट विक्री नेत्यांकडून मात्र विरोध, भरारी पथक माघारी
आचारसंहिता पथकाची भाजपा कार्यालयात धडक
तिकीट विक्री अंगलट: नेत्यांकडून मात्र विरोध, भरारी पथक माघारी
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भाजपामागे आता आचारसंहिता अंमलबजावणी विभागाच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. यासंदर्भात आचारसंहिता कक्षाचे भरारी पथक वसंत स्मृती येथे जाताच भाजपाच्या काही नेत्यांनी विरोध केला. चौकशीचे लेखीपत्र नसल्याने त्यास विरोध केल्यानंतर अखेरीस पथकाने तशी नोंद केली आणि ते माघारी फिरले.
यंदाच्या महापालिकेच्या निवडणूकीत भाजपाची उमेदवार यादीचा विषय गाजला. अनेकांनी तिकीट विक्री झाल्याचा आरोप केला. परंतु त्याच बरोबर भाजपा कार्यालयात उमेदवारांकडून दोन दोन लाख रूपये गोळा केला जात असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. त्याची सारवासारव सुरू असताना भाजपाचे नेते गोपाळ पाटील यांनी तिकीटासाठी दहा लाख रूपये देऊनही उमेदवारी मिळत नसल्याचा आणखी एक व्हीडीओ व्हायरल झाल्या. त्याचे भाजपाने खंडन केले असले तरी त्यातून भाजपासाठी हा विषय डोकेदुखी ठरला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी (दि. ८) निवडणूक विभागाच्या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथकाने मंगळवारी अचानक धडक दिली. दुपारी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला, तेव्हा भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी रघुनाथ कुलकर्णी हे प्रभाग प्रभारींच्या बैठकीत मार्गदर्शन करत होते. भरारी पथकाचे प्रमुख शिवाजी काळे तसेच सुनील कदम, प्रमोद मांडवे तसेच दोन पोलीस कर्मचारी तसेच व्हीडीओग्राफर यांचे पथक दाखल होताच भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी तसेच आमदार अपूर्व हिरे यांनी पथकाला विरोध केला. या पथकाने तिकीट विक्री प्रकरणात प्राथमिक माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. परंतु, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशीचे लेखी आदेश आहेत काय, अशी विचारणा करीत चौकशी पथकाला सहकार्य देण्यास असमर्थता दर्शवली. निवडणूक आयोगाच्या लेखी पत्राला पक्षाकडून लेखी उत्तर दिले जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर चौकशी पथकाचे अधिकारी आल्यापावली माघारी परतले. परंतु, याप्रकरणी प्राथमिक चौकशी असल्याने लेखी पत्र देण्यात आले नव्हते, मात्र आता या प्रकरणाची लेखीस्वरूपात पत्र देऊन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख शिवाजी काळे यांनी दिली. चौकशी पथकात तीन अधिकाऱ्यांसह दोन पोलीस कर्मचारी व दोन व्हिडीओग्राफरचा समावेश होता. (प्रतिनिधी)