मॉडेल कॉलेजप्रश्नी म्हापणचे ग्रामस्थ एकवटले
By admin | Published: April 2, 2015 10:57 PM2015-04-02T22:57:12+5:302015-04-03T00:44:17+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार: तीव्र आंदोलनाचाही इशारा
कुडाळ : केंद्र शासनाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हापण येथे मंजूर झालेले मॉडेल कॉलेज दुसऱ्या ठिकणी न वळविता ते म्हापणमध्येच व्हावे अन्यथा येथील पंचक्रोशीतील जनता तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मॉडेल कॉलेजच्या संदर्भात म्हापण पंचक्रोशीतील जनतेने घेतलेल्या सभेत प्रशासनाला दिला आहे. येत्या चार दिवसात या संदर्भात जिल्हाधिकारी यांचीही भेट घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कोकणातील तीन मॉडेल कॉलेजपैकी रायगड, श्रीवर्धन व रत्नागिरी येथील मंडणगड येथे ही मॉडेल कॉलेज सुरू झाली आहेत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापण येथे मंजूर झालेल्या कॉलेजला सुमारे ८ कोटी निधी मंजूर झाला असून कॉलेजला आवश्यक असलेली १० एकर जागाही उपलब्ध असतानाही कॉलेज सुरू करण्याबाबत प्रशासनाने कोणतीच पाऊले उचलली नाहीत. या उलट म्हापण येथे मंजूर झालेले मॉडेल कॉलेज म्हापण येथे न करता हे कॉलेज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य ठिकाणी बनविण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असल्याचे म्हापण पंचक्रोशीतील ग्रामस्थांना समजल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी मंजूर झालेले हे कॉलेज शाासनाने अन्यत्र वळवू नये, या निर्णयावर विचार विनिमय करण्यासाठी पाट हायस्कूल येथे बैठक आयोजित केली होती.या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, पाट सरपंच किर्ती ठाकूर, परुळे सरपंच प्रदीप प्रभू, कुशेवाडी सरपंच नीलेश सामंत, भोगवे सरपंच चेतन सामंत, आंदुर्ले सरपंच आरती पाटील, म्हापण सरपंच नाथा मडवळ, पाट पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र रेडकर, डी. ए. सामंत, लवू गावडे, विकास गावडे, दशरथ नार्वेकर, दत्ता साळगावकर, मिलिंद केळूसकर, अशोक सारंग, सुरेश प्रभू तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व प्रक्रिया झालेली असतानाही प्रशासन हे कॉलेज जिल्ह्यात अन्यत्र हलविण्याच्या प्रयत्नात आहे, हे आम्ही होऊ देणार नाही असा एकमुखी ठराव या सभेत सर्वांनी घेतला.
पंचक्रोशीत २० किलोमीटरवर महाविद्यालय नसल्याने येथील महाविद्यालयीन व उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यामुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे कॉलेज इथेच होणे गरजेचे आहे. म्हापण येथे मंजूर असलेले मॉडेल कॉलेज अन्यत्र हलविण्याचा प्रशासनाने प्रयत्न केल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ तीव्र आंदोलन व वेळ पडल्यास आमरण उपोषणही छेडणार असल्याचा ठरावही या बैठकीत घेण्यात आला. शिवाय याची सर्व जबाबदारी जिल्हाप्रशासन व विद्यापीठाची राहील असेही सांगण्यात आले. हे कॉलेज म्हापणमध्येच व्हावे याकरिता चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत ठोस निर्णय घेणार असून प्रशासनाने योग्य निर्णय न दिल्यास वेळ पडल्यास आम्ही न्यायालयातही जाऊ, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
गेल्या आठ महिन्यापूर्वी पाट हायस्कूलला विद्यापीठाचे असून या पत्रात मॉडेल कॉलेज असा उल्लेख आहे. तसेच तुमच्याकडे सुरू असलेल्या मॉडेल कॉलेज संदर्भात माहिती विचारण्यात आली होती. जर का कॉलेज सुरू झाले नाही तर पत्र कसे आले, याचाही खुलासा संबंधित प्रशासनाकडे मागण्यात येणार असल्याचे या बैठकीत
ठरले. (प्रतिनिधी)
शैक्षणिकदृष्ट्या ग्रामीण पातळीवरील विद्यार्थ्यांना विविध उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा, डिग्री कोर्सेस सहज उपलब्ध व्हावे याकरिता केंद्र शासनाने सन २०११-१२ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावात अशी तीन मॉडेल कॉलेजची मान्यता दिली होती व या मॉडेल कॉलेजवर मुंबई विद्यापीठाचे नियंत्रण राहणार आहे.
या बैठकीत हे मॉडेल कॉलेज शासनाने म्हापणमध्येच व्हावे असे २०११ साली जाहिर केले असून ८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. या कॉलेजसाठी लागणारी १० एकर जागाही पाट शिक्षण संस्थेने विना मोबदला देण्याचे जाहिर केले आहे. तसेच म्हापण कापावर ८ एकर जागाही आहे. या जागेची पाहणी त्यावेळी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी केली असून तात्पुरत्या स्वरुपात हे कॉलेज सुरू करण्यासाठी पाट हायस्कूलमध्ये जागाही देण्यात आली. त्याचप्रमाणे या ठिकाणी कॉलेज सुरू व्हावे याकरिता येथील दहा गावातील ग्रामसभेने ठरावही घेतले असून जिल्हाप्रशासन व विद्यापीठाकडे तसा ठरावही गेलेला आहे.