कोल्हापूरचा ज्ञानरचनावाद राज्यात ‘मॉडेल’
By Admin | Published: December 15, 2015 11:53 PM2015-12-15T23:53:21+5:302015-12-16T00:10:00+5:30
गडहिंग्लज,गगनबावड्यात अध्यापन : मार्चअखेर सर्व शाळांत राबवणार; चौथीपर्यंत दप्तराचे ओझे कमी
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -जिल्हातील गडहिंग्लज आणि गगनबावडा तालुक्यांत प्रभावीपणे राबविलेल्या ‘ज्ञानरचनावादाचा प्रयोग’ राज्यात मॉडेल ठरला आहे. त्याची दखल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी घेतली आहे. गेल्या महिन्यात कोल्हापूर दौऱ्यावर येऊन संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले आहे. त्यासाठी जिल्ह््यात पहिल्या टप्प्यात गडहिंग्लज आणि गगनबावडा या दोन तालुक्यांतील सर्व प्राथमिक शाळांतील पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांना ‘ज्ञानरचनावादा’प्रमाणे अध्यापन केले जात आहे. पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांवर मानसिक आणि शारीरिक ताण येत असतो. त्यामुळे राज्यभर पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्यापन करण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रभावीपणे ज्ञानाचे धडे देता येणार आहेत. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिकविले जात आहे. त्यासाठी शाळांतील भिंती विविध रंगांनी रंगवून बोलक्या केल्या जात आहेत. खोलीतील सर्व फरशीवर रंगकाम करून अक्षरओळख करून दिली जात आहे. पाढे, गाणी यांचे कृतियुक्त अध्ययन केले जाते. या अध्ययनासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी मोठा खर्च येत नाही. केवळ एक ते दोन हजार रुपये खर्च येतो. लोकवर्गणीतून तो करणे अपेक्षित आहे.
तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सर्वप्रथम गडहिंग्लज आणि गगनबावडा तालुक्यांतील शाळांत ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन सुरू केले. त्याचे चांगले परिणाम दिसले. मुलांना चांगले आकलन होत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले. त्यांना गतीने शिकण्यासाठी मदत होत आहे. शाळेबद्दल आकर्षण वाढले आहे. त्यामुळे नियमित उपस्थितीचे प्रमाण वाढले.
त्यामुळे जिल्ह्यांतील पहिली ते चौथीच्या वर्गांसाठी दोन हजार शाळांत ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण देण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षकही या पद्धतीला चांगला प्रतिसाद देत आहेत. ते स्वत: आपल्या कौशल्याचा
वापर करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गडहिंग्लजमध्ये ११४, गगनबावड्यात ७0 शाळा
गडहिंग्लज तालुक्यातील सर्व ११४ आणि गगनबावड्यामधील ७० शाळांमध्ये ज्ञानरचनावादाने शिकविले जात आहे. कमी कालावधीत दोन तालुक्यांत पूर्णपणे ज्ञानरचनावादाद्वारे अध्ययन केले जात असल्याने अन्य तालुक्यांतील शिक्षक हा प्रयोग पाहण्यासाठी जात आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील शाळांनाही या दोन तालुक्यांतील शाळा आदर्श ठरल्या आहेत. ज्ञानरचनावादाने अध्यापनाला व्यापकता येत त्याचे चळवळीत रूपांतर होत आहे.
ज्ञानरचनावाद अध्ययन पद्धती विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरते आहे. जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि गगनबावडा तालुक्यांत सर्व शाळांमध्ये या पद्धतीने शिकविले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार शाळांमध्ये मार्च २०१६ अखेर या अध्ययन पद्धतीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- सुभाष चौगुले,
प्राथमिक शिक्षणाधिकारी