राज्यातील आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 08:03 PM2018-04-25T20:03:23+5:302018-04-25T20:03:53+5:30
राज्यातील आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे.
मुंबई : राज्यातील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर, वाशिम, मुक्ताईनगर,बोदवड,यवतमाळ या आठ तालुक्यात जून ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस तसेच भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा विचार करुन, प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन, मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
२०१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, दिग्रस, घाटंजी,केळापूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड या आठ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जारी केलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. जमीन महसुलात सुट, सरकारी कजार्चे पुर्नगठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात ३३.०५ टक्के सूट,शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सची सोय, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे माध्यान्ह भोजन योजना दीर्घ मुदतीच्या सुट्टीच्या काळातही सुरु ठेवण्यात येणार आहेत इत्यादी फायदे या तालुक्याना मिळतील.