मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दमदार पाऊस

By admin | Published: June 18, 2017 12:48 AM2017-06-18T00:48:30+5:302017-06-18T00:48:30+5:30

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बहुतांश भागात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.

Moderate rain in Central Maharashtra, Marathwada | मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दमदार पाऊस

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दमदार पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बहुतांश भागात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. खंडाळा येथे चोवीस तासांत ९०, मंगळवेढा आणि पुणे परिसरात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारामती, पुरंदर, सासवड आणि सातारा येथेही ३० मिलिमीटर पाऊस झाला. अकोले, आटपाडी, हातकणंगले, मोहेळ येथे २०, इगतपुरी, इंदापुर, कोल्हापुर, पंढरपुर, पौड-मुळशी, फलटण आणि येवल्यात १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला. नांदेड शहर व परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या धो-धो पावसामुळे बहुतांश भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते़ तासभरातच नांदेड शहरातील सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते़ त्यानंतरही सायंकाळी उशिरापर्यंत रिमझिम सुरुच होती़
हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, पोत्रा तर वसमत तालुक्यातील कौठा, कुरुंदा परिसरात जोरदार पाऊस झाला. हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे परिसरात तीन तास मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शुक्रवारी रात्री केज, अंबजोगाई व आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये रिमझीम पाऊस झाला. चिमूर येथे ४०, खारंगी ३०, धारणी, नांदगाव, यवतमाळ येथे २०, भंडारा, चिखली, धामणगाव, जळगाव, कळंब, लोणार, मुर्तजापूर, नरखेड आणि सिंदखेड राजा येथे १० मिलिमीटर पाऊस पडला.

पावसाने खंबाटकी घाटाचे तीन-तेरा
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात शुक्रवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याखालची जमीन वाहून गेली असून, संरक्षक कठड्यांचे खांबही थेट दरीत कोसळले आहेत. केवळ एका तासात ८९ मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर घाटातली वाहतूक सुरक्षा पूर्णपणे धोक्यात आली आहे. शनिवारी दिवसभरात घाटातील चिखल राडा काढण्याचे काम तसेच नालेसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. घाटात ठिकठिकाणी जेसीबी मशीनद्वारे मुरूम उकरून रस्ता मोकळा केला जात होता.
गेल्या वर्षभरात खंबाटकी घाटातील महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी एका बाजूने डोंगरही पोखरण्यात आला आहे. मात्र, डोंगराची ही बाजू सरंक्षित केलेली नसल्याने वरून पाण्यासह दगड गोटे रस्त्यावर वाहून आले होते.

राज्यात सोमवारपासून सर्वदूर जोरदार पाऊस
कोकण, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी रविवारी पावसाच्या सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रतील काही ठिकाणी पाऊस होईल. सोमवारपासून पुढील तीन दिवस मात्र राज्यात सर्वत्र पाऊस होईल. कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने कळविले आहे.

Web Title: Moderate rain in Central Maharashtra, Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.