मराठवाड्यात निम्माच पाऊस
By admin | Published: August 28, 2015 02:58 AM2015-08-28T02:58:05+5:302015-08-28T02:58:05+5:30
देशभरातील पावसाची तूट आणखी वाढत १२ टक्के झाली आहे. दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या मराठवाड्यात तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली. देशाच्या ३६ टक्के
नवी दिल्ली : देशभरातील पावसाची तूट आणखी वाढत १२ टक्के झाली आहे. दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या मराठवाड्यात तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली. देशाच्या ३६ टक्के भागात अद्यापही अपुरा पाऊस असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यात ७ टक्के वाढ झाल्यामुळे एकूणच देशपातळीवरील चित्र फारसे आशादायक नाही.
हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या काही भागात पावसाचे प्रमाण वाढले असले तरी एकूण ५१ टक्के म्हणजे निम्म्या देशात सामान्य पाऊस झाल्याचे दिसते. ३६ उपविभागांपैकी १८ मध्ये सामान्य, तर १५ उपविभागांत अपुरा पाऊस झाला.
देशाच्या चार प्रमुख विभागांची स्थिती पाहता दक्षिण आणि मध्य भागाला अपुऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या दोन्ही भागांमध्ये अपुऱ्या पावसाचे प्रमाण अनुक्रमे २० आणि १५ टक्के आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक ५०, तर त्यापाठोपाठ कोकण- गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अपुऱ्या पावसाचे प्रमाण अनुक्रमे ३८ आणि ३२ टक्के आहे. कर्नाटकची किनारपट्टी, तेलंगणा, केरळमधील अपुऱ्या पावसाचे प्रमाण तुलनेत कमी, अनुक्रमे ४४, २८, २५ आणि ३१ टक्के आहे. पूर्व उत्तर प्रदेशात ३६, तर प. उत्तर प्रदेश आणि पंजाबात अनुक्रमे ३० आणि ३१ टक्के अपुरा पाऊस झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सामान्य पावसाची नोंद झालेल्या उपविभागांमध्ये विदर्भाचा समावेश आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पूर्व राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पाँडिचेरी, लक्षद्वीप, अंदमान- निकोबार बेट आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकला सामान्य पावसाने काहीसा दिलासा दिला. काही भागात जूनमध्ये १६ टक्के जास्त पाऊस झाला; मात्र जुलैमध्ये १७ टक्के अपुरा पाऊस झाल्याने चित्र बदलले. आॅगस्टमध्येही १० टक्के अपुरा पाऊस झाल्यामुळे सरासरी तूट वाढतच गेली.