साहित्य संमेलनास देणार आधुनिक लूक
By admin | Published: October 24, 2016 04:53 AM2016-10-24T04:53:13+5:302016-10-24T04:53:13+5:30
साहित्य संमेलननगरीस पारंपरिक लूकऐवजी मॉडर्न लूक देणार, अशी माहिती कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती
डोंबिवली : साहित्य संमेलननगरीस पारंपरिक लूकऐवजी मॉडर्न लूक देणार, अशी माहिती कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी झाले.
उद्घाटन प्रसंगी साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी, शुक्राचार्य गायकवाड,प्राचार्य अशोक महाजन, डॉ. दिनेश म्हात्रे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश देशपांडे, चंद्रकांत माने, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे उपस्थित होते. कार्यालयाचे उद्घाटन डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते झाले. उद््घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते होणार होते.
मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. मात्र, देवळेकर नाराज असल्याने ते आले नसल्याची चर्चा उद्घाटन प्रसंगी सुरू होती. धबडे यांनी सांगितले की, संमेलनाच्या ठिकाणी एक साहित्यिक टॉवर उभा करण्याचे विचाराधीन आहे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक पु.भा. भावे, शं.ना. नवरे यांचे शिल्प तयार करण्यात येणार आहे. या विविध कल्पना आता कागदावर आहेत. त्या प्रत्यक्षात उतरवण्याचे विचाराधीन असल्याचे ते म्हणाले.
डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले की, कार्यालय स्मार्ट आहे. त्यामुळे संंमेलनही स्मार्ट होणार, यात दुमत नाही. संमेलनाची टॅगलाइन ‘स्मार्ट साहित्य संमेलन’ अशी असावी. त्याचा विचार व्हावा. तसेच निवास व निधीचा आढावा घेण्यात यावा, अशी सूचना केली. आयोजकांनी निधी गोळा करण्यासाठी स्वत:लाच एक डेडलाइन आखून घ्यावी. संमेलनात साहित्यिकांचा मिलाफ घडवून आणावा.
हे संमेलन साहित्यप्रेमींचे असावे, जेणेकरून शंभरावे साहित्य संमेलन पुन्हा डोंबिवलीत घेतले जावे, अशी अपेक्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली. प्राचार्य महाजन यांनी सांगितले की, शहरात लहानमोठी ३५ महाविद्यालये आहेत.
या तरुणाईला संमेलनाकडे वळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. साहित्यिक गायकवाड यांनी संमेलनाच्या व्यासपीठावर बहुजनांना स्थान मिळावे, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. मसापचे देशपांडे यांनी सांगितले की, सध्या सगळीकडे डोंबिवलीत साहित्य संमेलनाचा फिव्हर आहे. त्याचा फायदा संमेलनाच्या यशस्वितेसाठी नक्कीच होईल. संमेलनासाठी सगळ्यांनी एकत्रित येण्याचे आवाहन वझे यांनी केले. (प्रतिनिधी)