जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करणार
By admin | Published: July 8, 2017 05:58 AM2017-07-08T05:58:28+5:302017-07-08T05:58:28+5:30
राज्यातील कलावंतांना चांगले आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच
विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : राज्यातील कलावंतांना चांगले आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करीत असतानाच अस्तित्वात असलेल्या जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करून राज्याची सांस्कृतिक संपदा आम्ही जोपासणार आहोत, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अलिबाग येथे केली.
चेंढरे (अलिबाग) येथे पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर उभारलेल्या राज्यातील पहिल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्र ीडामंत्री विनोद तावडे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, अलिबागचे आ. सुभाष ऊर्फ पंडित पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जि. प. उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नलिनी लिमये, पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील, तसेच रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे कळ दाबून, अॅड. नाना लिमये रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. त्यानंतर अलिबाग येथील नमन नृत्य संस्थेच्या कलावंतांनी अमोल कापसे निर्मित नांदीनृत्य सादर करून या नाट्यगृहाचे कलात्मक उद्घाटन झाले. आ. जयंत पाटील यांच्या ६२व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अलिबाग येथे अत्यंत चांगले आणि अत्याधुनिक नाट्यगृह उभे राहिले आहे. सुंदर आणि सुसज्ज नाट्यगृह सहकार क्षेत्रामार्फत सुरू झाले, हे काम चांगलं आहे, म्हणूनच अशा चांगल्या कामांच्या पाठीशी सरकार उभे आहे. राज्यात कलेचे क्षेत्र रुं दावत आहे आणि विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी राज्यात चांगल्या नाट्यगृहांची आवश्यकता आहे. त्यास शासनाचे प्राधान्य असेल, असे नमूद करून फडणवीस यांनी सिनेरसिकांना दर्जेदार चित्रपट पाहता यावे, यासाठी थिएटर उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले. आ. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार अलिबाग येथे भाऊ सिनकर यांचे खुले नाट्यगृह उभारण्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी अखेरीस दिले. प्रास्ताविक पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी केले. याप्रसंगी सदर नाट्यगृह उभारणीत मोलाची कामगिरी करणारे शशिकांत मोहिते, भगवान मालपाणी, क्रीझ डिसुजा, सौरभ खेर आणि ज्येष्ठ रंगकर्मी भाऊ सिनकर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि भार्गवी चिरमुले यांनी केले.
भाऊ सिनकर यांचा सत्कार, मोठ्या संघर्षनाट्यावर पडदा
आ. सुनील तटकरे यांनी आ. जयंत पाटील यांना शुभेच्छा देत असतानाच, अलिबागेत नाट्यगृह परंपरा सुरू करणारे नाट्यरसिक भाऊ सिनकर यांचा सत्कार केल्याने एक मोठ्या संघर्षनाट्यावर पडदा पडल्याचे नमूद केले. ‘साठी बुद्धी नाठी’ असे म्हटले जाते; परंतु ते आमच्या बाबतीत होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी अखेरीस दिली. आ. जयंत पाटील या वेळी बोलताना म्हणाले, कायदे मंडळ जनतेसाठी आहे, याची प्रचिती विनोद तावडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली. ७.५ कोटी रुपये खर्चापैकी ३ कोटी त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. राजकारणापलीकडे जाऊन काम करण्याची इच्छा असेल तर असे काम उभे राहू शकते, असे त्यांनी अखेरीस सांगितले.
नाट्यतिकिटांवरील ‘जीएसटी’तून उभारणार नाट्यगृहे - विनोद तावडे
जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यापासून, नाट्य व चित्रपट निर्मात्यांना वाटणारी चिंता लक्षात घेता, शासनाने २५० रु पयांवरील तिकिटांवर जीएसटी आकारण्याची मर्यादा ही ५०० रु पयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती केंद्रीय जीएसटी नियामक मंडळ राज्य सरकारने केली आहे.
तिकिटांवरील कराच्या रकमेतून राज्याला प्राप्त होणारा निधी नाट्यगृहे बांधण्यासाठीच वापरायचा, असे धोरणही राज्य शासनाने निश्चित केले आहे, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी बोलताना जाहीर केले.
विरोधकांना कानपिचक्या
या नाट्यगृहाच्या उद्घाटनास मुख्यमंत्र्यांनी येऊ नये, याकरिता काही विरोधक देव पाण्यात घेऊन बसले होते; परंतु मुख्यमंत्री आणि आमचे सरकार चांगल्या कामासाठी ठाम आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नाट्यगृह असावे, अशी शासनाची भूमिका असल्याचा पुनरु च्चार त्यांनी केला. चांगले चित्रपट प्रदर्शित करता यावे, यासाठीही मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध करण्यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचे तावडे यांनी सांगितले.
याशिवाय नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी जुन्या कलावंतांच्या आठवणी डिजिटल स्वरूपात संग्रहित करण्याचा उपक्र मही शासनाने सुरू केला आहे. राज्यातील सहकारातील पहिले नाट्यगृह अलिबागेत सुरू झाले. दुसरे सिंधुदुर्गात करण्याचा मनोदय विनोद तावडे यांनी अखेरीस व्यक्त केला.