सीमेवर तणाव असताना मोदी प्रचारसभेत
By admin | Published: October 13, 2014 10:34 PM2014-10-13T22:34:24+5:302014-10-13T23:04:13+5:30
आर. आर. पाटील : तासगाव येथे सभा, भाजप धोरण शेतीविरोधी
तासगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूने विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत असताना सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान शहीद होत आहेत. पंतप्रधान म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे का निवडणुका महत्त्वाच्या, असा सवाल माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव येथे उपस्थित केला. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, सत्तेवर आल्यावर महागाई कमी करणार म्हणणाऱ्या भाजप सरकारने महागाई वाढवली. शेतीमालाच्या दरात वाढ व्हायला लागल्यावर आयात-निर्यातीचे धोरण बदलले. शेतकऱ्यांच्या मालाचे दर गडगडले, तर उद्योगपतींच्या उत्पादनांचे दर वाढले. भाजपचे धोरण उद्योगपतींना पाठीशी घालणारे आहे. भाजपचे नेते विदर्भ वेगळा करू, असे सांगतात. राज्याचे तुकडे पाडायला निघालेल्यांच्या हाती राज्य द्यायचे का? तासगाव, कवठेमहांकाळमधील दुष्काळ हटविण्याचे काम केले आहे. पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही तालुके राज्यातले समृध्द तालुके केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या, भाजपने केवळ जाहिराती केल्या आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने आर. आर. पाटील यांचे मोठेपण टिकविण्याची गरज आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील, विजय सगरे, भारत डुबुले, अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनूरकर, विश्वास माने यांची भाषणे झाली. सांगता सभेपूर्वी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तासगावातून सवाद्य रॅली काढली. (वार्ताहर)