पंतप्रधान मोदी मला मान्य नाहीत - श्रीपाल सबनीस

By admin | Published: January 1, 2016 04:24 PM2016-01-01T16:24:33+5:302016-01-01T17:02:55+5:30

मन की बातमधून जनतेशी संवाद साधणारे मोदी संसदेत महत्वांच्या विषयावर मौन सोडत नाही, ते देशात बोलत नाहीत, पण परदेशात भाषणे देतात, ही त्यांची अंतर्गत भूमिका मला मान्य नाही, असे सबनीस म्हणाले.

Modi does not accept me - Shripal Sabnis | पंतप्रधान मोदी मला मान्य नाहीत - श्रीपाल सबनीस

पंतप्रधान मोदी मला मान्य नाहीत - श्रीपाल सबनीस

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - गोध्रा हत्याकांडामुळे नरेंद्र मोदी कलंकित झाले मात्र तेच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गौतम बुद्ध, महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतवाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. संघातून आलेल्या  मोदींचं स्वागत करायला पाकिस्तान किंवा इस्लाम राष्ट्रे वेडी नाहीत, असे सांगत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मात्र आपण पंतप्रधानांचे समर्थक आहोत, नरेंद्र मोदींचे नव्हे असे स्पष्ट करत रेडिओच्या 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणारे पण संसदेत मौन न सोडणारे, परदेशात भाषणं करणारे आणि देशातील माध्यमांसमोर काहीही न बोलणारे मोदी आपल्याला बिलकूल मान्य नाहीत, त्यांच्या या अंतर्गत भूमिकेवर मला आक्षेप आहे, असेही सबनीस म्हणाले. 
दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकमध्ये गेले, त्यांना तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी त्यांना श्रद्धांजली वहावी लागली असती, असे वक्तव्य पिंपरीतील कार्यक्रमादरम्यान केल्यामुळे चर्चेत आलेल्या सबनीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना  पुरस्कार वापसीपासून ते दुष्काळापर्यंत अनेक मुद्यावर आपली मतं परखडपणे मांडली. 
नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती म्हणून मला मान्य नाही, पंतप्रधान म्हणूनही त्यांच्या अनेक भूमिकांना माझा विरोध आहे, पण त्याच भारताच्या पंतप्रधान मोदींच्या तोंडून परदेशात भारताचे बुद्ध, गांधी यांचा उल्लेखाने जगातील क्रौर्य, दहशतवाद दूर होत असेल, परदेशातील व्यक्ती त्यांचा स्वीकार करत असतील, तर मग आपण त्यांना विरोध का करायचा? आपले त्यांच्याशी मतभेद असू शकतात, त्यावरून आपण भांडूही शकतो, पण जर मोदींच्या तोंडून गांधी, बुद्ध येत असतील तर त्याचं  स्वागत केलं पाहिजे, अशी भूमिका सबनीस यांनी मांडली. 
देशातील वाढत्या असहिष्णूतेमुळे विविध साहित्यिक, लेखक आणि दिग्गजांनी केलेल्या पुरस्कार वापसीचेही सबनीस यांनी समर्थन केलं. कलबुर्गी यांची झालेली हत्या आणि बीफच्या मुद्यावरून दादरी येथे जमावाच्या मारहाणीत झालेल्या इखलाख या मुसलमानाचा मृत्यू, या दोन्ही अतिशय निंदनीय घटना आहेत, त्यामुळेच पुरस्कार वापसी झाली आणि मी त्या पुरस्कार वापसीचे समर्थन करतो, असं सबनीस म्हणाले. पुरस्कार वापसीचा निर्णय हा असा अचानक घेण्यात आला नव्हता. मात्र तो घेण्यापूर्वी त्यांनी सरकारशी संवाद साधून, आपल्या समस्या, आक्षेप सांगायला हवे होते. सरकारच्या असहिष्णुतेबद्दल भारताचीच जनता असलेल्या या दिग्गजांनी पुरस्कार परत केले ना? पण हे सरकारही त्यांचच आहे ना, मग निषेधाचा मार्ग म्हणून पुरस्कार वापसीसारखं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी संवाद का साधला नाही? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ आपणही पुरस्कार वापस केला असता, पण तत्पूर्वी सरकारशी संवाद साधलाच असता असे सांगत सबनीस यांनी सुसंवाद महत्वाचे असल्याचे आवर्जून नमूद केले. 
 
साहित्य संमेलन रिकाम टेकड्यांचा अड्डा हे वक्तव्य नेमाडेंनाच लखलाभ
साहित्य संमेलन रिकाम टेकड्यांचा अड्डा हे भालचंद्र नेमाडेंचे वक्तव्य मला बिलकूल पटत नाही, त्यांचे हे वक्तव्य त्यांनाच लखलाभ. वारीला दरवर्षी येणारे ८-१० लाख भाविक रिकामटेकडे नसतील तर मग त्यांच्याप्रमाणेच साहित्यावर श्रद्धा असणारे एकत्र येत असतील तर त्यांना रिकाम टेकडं का म्हणायच? अस विचारत मी किंवा संमेलानाला येणारी कोणतीच व्यक्ती रिकाम टेकडा नाही, असे स्पष्ट मत सबनीस यांनी मांडले. तसेच नेमाडे आमच्या मंचावर येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू असेही ते म्हणाले.
 

Web Title: Modi does not accept me - Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.