आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी- डॉ. भालचंद्र मुणगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 01:50 AM2018-09-14T01:50:44+5:302018-09-14T06:37:45+5:30
‘भारतासमोरील आर्थिक आव्हाने : स्वरूप आणि उपाय’ या विषयावर बोलताना मुणगेकर यांनी आपली मते मांडली.
इंदापूर : देशात गेल्या अकरा वर्षांत २ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज आर्थिक प्रगतीचा दर २ टक्क्यांनी कमी झाला आहे. नोटाबंदीचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला. जीएसटीमध्ये बदल करून हे बिल पाच टप्प्यांत केले आहे. आज डिझेल व पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशात बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला असून स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत अपयशी अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली ठरले आहेत. त्यामुळे मोदी सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे,अशी सडेतोड टीका राज्यसभेचे माजी खासदार तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी गुरूवारी केली.
कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रांगणात कर्मयोगी व्याख्यानमालेत ‘भारतासमोरील आर्थिक आव्हाने : स्वरूप आणि उपाय’ या विषयावर बोलताना मुणगेकर यांनी आपली मते मांडली.
माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख ‘युवाभान : राष्ट्रशक्ती’ या विषयावर बोलताना म्हणाले की , ‘पराक्रमाच्या वयात पराक्रम करावाच लागतो. निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी सामर्थ्य दिले आहे ते स्व: आपल्याला शोधून आपल्याला घडावे लागेल. प्रत्येकाला जेवढ्या लवकर आपले स्व: समजेल तेवढी आपली प्रगती व भविष्य लवकर घडणार आहे. महाविद्यालयातील कोणत्या कट्ट्यांवर आपण जास्त रेंगाळतो, यावर आपले भविष्य घडते. तारुण्यामध्ये तीन गोष्टी जपायच्या असतात ते म्हणजे तेजस्विता, तपस्वीता आणि तत्परता होय. कठीण किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आपण बुद्धी समतोल ठेवून निर्णय घेतले पाहिजे व लाखांचा पोशिंदा होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, ‘भाऊंनी आयुष्यभर लोकांसाठी कार्य केले. समाज उभा करण्याचे काम भाऊंनी केले. राजकारणामध्ये एक नैतिक अधिष्ठान असावे लागते ते भाऊंच्या रूपाने आम्हाला पाहावयास मिळाले.
संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, अॅड. कृष्णाजी यादव, तुकाराम जाधव, प्रा. बाळासाहेब खटके, भरत शहा, रमेश जाधव, मयूर पाटील, मंगेश पाटील, चित्तरंजन पाटील, दीपक जाधव, महेंद्र रेडके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महादेव वाळुंज आणि प्रा. बाळासाहेब पराडे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी आभार मानले.
सहकार चळवळ कुणीही नष्ट करू शकणार नाही...
सहकार चळवळीने राज्यात आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवल्याचा इतिहास आहे. पण सध्या सहकार चळवळ मोडीत काढण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे. परंतु, ही चळवळ कुणीही नष्ट करू शकणार नाही, असेही मुणगेकर यांनी सुनावले.