मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:50 AM2018-05-28T05:50:11+5:302018-05-28T05:50:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे सामान्य आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारने चार वर्षांत प्रचंड मोठे विकासकार्य केले असून...
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे सामान्य आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारने चार वर्षांत प्रचंड मोठे विकासकार्य केले असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळाल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.
मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार व प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मोदी सरकारची चार वर्षे ही संपूर्ण देशाच्या प्रगतीची वर्षे आहेत. सरकारने सामान्य माणसासाठी काम केले असून वेगवेगळ्या योजनांचा कोट्यवधी लोकांना लाभ झाला आहे. दरवर्षी आपले प्रगतिपुस्तक जनतेसमोर मांडणारे पारदर्शी सरकार देशात आहे. विरोधकही मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाहीत, असे सांगतानाच मोदी सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आठ हजार कोटींचा निधी दिला. इतका निधी यापूर्वी कधीच मिळाला नव्हता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचाही राज्यातील शेतकºयांना मोठा लाभ झाला. बीड, जालनासारख्या एका एका जिल्ह्याला यातून ८०० कोटी मिळाले. केंद्र सरकारने राज्यातील शेतकºयांसाठी शीतगृहे, अन्न प्रक्रिया प्रकल्पही मोठ्या प्रमाणावर मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सिंचनाचे अर्धवट पडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचन सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात आतापर्यंतचे महामार्गांचे सर्वाधिक काम सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राला केंद्राकडून प्रचंड मोठे पाठबळ लाभले आहे. आर्थिक विकास, गरिबांचे कल्याण, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावणे, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी सरकार देणे अशा अनेक बाबतीत मोदी सरकारने प्रभावी कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
रेल्वेसाठी मोठा निधी
त्यांनी सांगितले की, अनेक दशके रेंगाळलेले महाराष्ट्राचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्र सरकारने मदत केली आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि आताचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रचंड निधी मंजूर केला आहे. मुंबईची रेल्वे सेवा सुधारण्यासाठी एकाच अर्थसंकल्पात ४० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात एकाच शहरासाठी इतका निधी देण्यात आला ही अभूतपूर्व घटना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.