किरीट सोमय्यांना मोदी सरकारकडून 'पॉवर'?; ठाकरे सरकार वि. भाजप संघर्ष पेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:00 AM2021-09-08T11:00:58+5:302021-09-08T11:01:50+5:30
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना शिंगावर घेणाऱ्या किरीट सोमय्यांना केंद्र सरकारकडून कवचकुंडलं
मुंबई: ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी त्यांना धमक्या मिळत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून सोमय्या ऍक्टिव्ह मोडमध्ये असून शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या रडारवर आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना खासदार भावना गवळी, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोमय्यांनी घणाघाती आरोप केले आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्यानं किरीट सोमय्या करत आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढत असल्यानं धमक्या येत असून जीवाला धोका असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर आता केंद्रानं त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ४० जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.
'प्लीज मला इथून घेऊन चला'; वर्ध्याच्या भाजपा खासदाराच्या सुनेचा VIDEO रुपाली चाकणकरांकडून ट्विट, कुटुंबाकडून मारहाण?
गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत आहेत. विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या रडारवर आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांचा बंगला अवैध असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर नार्वेकरांना बंगला पाडावा लागला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'ठाकरे सरकारचा एक अनिल (माजी गृहमंत्री अनिल देशमुख) जेलच्या दरवाजात उभा आहे, तर दुसरा अनिल (परिवहन मंत्री अनिल परब) जेलमध्ये जाण्याचा मुहूर्त शोधत आहे. हे दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार,' असं सोमय्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं.
शिवसेना वि. सोमय्या वाद आणखी पेटणार?
गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना वि. सोमय्या यांच्यातला वाद पेटला होता. महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप सोमय्यांनी केले होते. सोमय्यांनी थेट मातोश्रीचा उल्लेख करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. त्यांनी वारंवार माफिया शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले होते. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना नेत्यांनी सोमय्यांना तिकीट न देण्याची मागणी केली. त्यामुळे सोमय्यांचे तिकीट कापलं गेलं. त्यांच्या जागी मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं.