मोदींनी देशात आर्थिक यादवी निर्माण केली - उद्धव ठाकरे
By admin | Published: November 14, 2016 07:48 AM2016-11-14T07:48:19+5:302016-11-14T07:48:19+5:30
शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावर जोरदार आगपाखड केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - राज्यात आणि केंद्रात सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावर जोरदार आगपाखड केली आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या सवाशे कोटी आहे. हे सर्व लोक भ्रष्टाचारी व काळा पैसावाले आहेत काय? देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर तोफ डागली आहे.
३० डिसेंबरनंतर आणखी एक मोठा निर्णय जाहीर करण्याचे संकेत मोदींनी रविवारी दिले. त्यावरही उद्धव यांनी उपरोधिक टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाची परतफेड जनतेला असे रस्त्यावर आणून केली काय? हा सरळ सरळ विश्वासघात आहे.
मूठभर उद्योगपतींकडील काळे धन बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने सवाशे कोटी जनतेला रस्त्यावर आणले. अन्नपाण्याशिवाय उन्हात तडफडायला व मरायला लावले. काळा पैसा संपविण्यासाठी केलेला हा प्रयोग अघोरी आहे अशी बोचरी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतोय, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या सवाशे कोटी आहे. हे सर्व लोक भ्रष्टाचारी व काळा पैसावाले आहेत काय? देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय?
- पंतप्रधान मोदी यांनी जपानच्या भूमीवरून जाहीर केले आहे की, ३० डिसेंबरनंतर ते आणखी एक जोरदार धमाका करणार आहेत. पाचशे-हजारच्या नोटा अचानक रद्द करून त्यांनी हिंदुस्थानच्या सवाशे कोटी जनतेवर आर्थिक अराजकाचा बॉम्ब आधीच टाकला आहे. या बॉम्बहल्ल्यात विव्हळणार्या जनतेला सॅल्यूट करीत त्यांनी सांगितले की, ३० डिसेंबरनंतर आणखी एक धमाका करू! बहुधा पंतप्रधान पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून दहशतवादाचा कारखाना दाऊदसह बेचिराख करण्याच्या विचारात असावेत. नाही तरी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच सांगून टाकले आहे की, पाकिस्तानवर आम्ही अणुबॉम्ब टाकू. बहुधा हाच धमाका ३० डिसेंबरनंतर होईल. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार व्हायला आता फक्त २०-२५ दिवसांचा अवकाश आहे असे देशातील जनतेने समजायला हरकत नाही. ज्याप्रमाणे एका रात्रीत पाचशे-हजारच्या नोटा रद्द करण्याचे सिक्रेट मिशन मोदी यांनी तडीस नेले त्याचप्रमाणे ३० डिसेंबरनंतर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू केल्याची घोषणा होईल.
- कश्मीरातील ३७० कलम हटवून ‘एक राष्ट्र, एक निशाण’चे स्वप्न साकार होईल. ३० डिसेंबरच्या मध्यरात्री अयोध्येत राममंदिर उभारणीच्या घोषणेचा धमाकाही होऊ शकतो. देशवासीयांनी ३० डिसेंबरनंतरच्या या धमाक्याची वाट पाहायला हवी. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे की, पाचशे-हजारच्या नोटा एका क्षणात रद्द केल्याने जनता त्यांना आशीर्वाद देत आहे. मोदीजी, जनतेचे आशीर्वाद इतके स्वस्त आहेत काय? दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाची परतफेड जनतेला असे रस्त्यावर आणून केली काय? हा सरळ सरळ विश्वासघात आहे. मूठभर उद्योगपतींकडील काळे धन बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने सवाशे कोटी जनतेला रस्त्यावर आणले. अन्नपाण्याशिवाय उन्हात तडफडायला व मरायला लावले. काळा पैसा संपविण्यासाठी केलेला हा प्रयोग अघोरी आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर आहे.
- देशातला काळा पैसा, बेहिशेबी संपत्ती खतम व्हायलाच पाहिजे! काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतोय, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या सवाशे कोटी आहे. हे सर्व लोक भ्रष्टाचारी व काळा पैसावाले आहेत काय? सरकारचे असे म्हणणे आहे की, आता काळा पैसा बाहेर येईल. आम्ही विचारतो, कसा बाहेर येईल? देशातला काळा पैसा सवाशे कोटी मध्यमवर्गीयांकडे नसून देशाच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत अशा १२५ घराण्यांकडे व राजकारण्यांकडे आहे. यापैकी किती लोक हजार-पाचशेच्या नोटांची बंडले घेऊन रांगेत उभे आहेत? त्यांचा पैसा परदेशी बँकांत सुरक्षित आहे व मोदी यांचा निर्णय होण्याआधीच या पैशाला परदेशाचे पाय फुटले असतील तर या लोकांवर काय कारवाई झाली?
- २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड काळा पैसा फिरवला आणि जिरवला गेला त्याचा हिशेबही आता द्यावाच लागेल. पंतप्रधान मोदी देशात कमी आणि परदेशातच जास्त फिरतात अशी टीका त्यांचे विरोधक करतात. आताही मोदी जपानलाच होते. पंतप्रधान परदेशात सतत फिरतात ते जनतेच्या कष्टाच्या पैशांवर आणि त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहून नोटा बदलाव्या लागलेल्या नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे. नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या मनाची दशा समजून घेतली पाहिजे. त्यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला करायचे सोडून सवाशे कोटी जनतेवर हल्ला केला, त्यांना घायाळ केले, रांगेत उभे करून मारले व त्या हतबल लोकांना ‘शूर’ ठरवून त्यांना सॅल्यूट केले. ही त्यांच्या स्वाभिमानाची आणि राष्ट्रभक्तीची थट्टा आहे! पंतप्रधानांनी रांगेत उभे राहिलेल्या माता-पित्यांची, मातृभक्तांचीही साफ खिल्ली उडवली आहे. हजार-पाचशेच्या नोटा रद्द होताच वृद्धाश्रमात ढकललेल्या आई-वडिलांच्या बँक खात्यांवर पैसे जमा झाले असे पंतप्रधान म्हणतात.
- हा देश मातृभक्त आहे. स्वत: पंतप्रधान मातृभक्त आहेत. देशातील सवाशे कोटी जनतेने आपल्या माता-पित्यांना वृद्धाश्रमात ढकलले आहे असे सरकारला म्हणायचे असेल तर देशातील तरुण श्रावणबाळांच्या मातृभक्तीचा हा अपमान आहे. आज रस्ते सुनसान आहेत, दुकानात खडखडाट आहे. भाजीपाला बाजारात ग्राहक नाही. माल आहे पण उठाव नाही. मजुरांना काम नाही. कारण मालक व ठेकेदारांकडे पैसे नाहीत. पेट्रोल पंप बंद पडत आहेत व स्कूल बसदेखील बंद झाल्या आहेत. लोकांना स्वत:च्या हक्काचे पैसे बँकेतून काढण्यासाठी चार-चार दिवस झगडावे लागत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर सामान्य जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट होईल. देशातील वातावरण असे संवेदनशील झाले आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात की, आणखी दोन-तीन आठवडे परिस्थिती पूर्ववत होण्यास लागतील. त्यांनी असेही सांगितले की, घाबरू नका, नव्या नोटा भरपूर आहेत. मात्र हे झूठ आहे.
- फक्त दोन हजारांसाठी लोकांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. खून, मारामार्या, चोर्यांचे प्रमाण वाढले आहे व यालाच यादवी म्हणतात. देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. मूठभर लोकांच्या हातात आजही देशाची आर्थिक सत्ता कायम आहे. त्यांच्या मुठीत गुदमरलेला देश कधी मुक्त होणार? उद्याच्या निवडणुका त्याच मूठभर लोकांच्या पैशांवर पुन्हा लढवल्या जातील व सत्ता मिळवली जाईल. त्यांना आजही पूर्ण संरक्षण रोकड्यात आहे, पण गरीब जनता, मजूर, शेतकरी हवालदिल होऊन रस्त्यांवर आहे. पंतप्रधानांनी त्यांचा आक्रोश समजून घ्यावा. भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काळा पैसा हा कॅन्सर आहे. त्याने देश पोखरला जात आहे हे खरेच, पण आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय?