मोदींच्याच मंत्र्यांनी दिली कबुली; नोटबंदी-जीएसटीमुळेच देशात आर्थिक मंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 03:14 PM2019-09-08T15:14:46+5:302019-09-08T15:24:56+5:30
देशात आलेल्या आर्थिक मंदीला मोदी सरकारने घेतलेले निर्णय कारणीभूत असल्याचा आरोप आतापर्यंत विरोधकांकडून होत होता.
नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी ही देशातील आर्थिक मंदीची प्रमुख कारणे असल्याचे, देशातील सर्वसामान्यांनंतर आता भाजपच्या मंत्र्यांनेच मान्य केले आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील इचावार येथील केंद्रीय ग्रामोद्योग आयोगात तपासणीसाठी आलेले केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
देशात आलेल्या आर्थिक मंदीला मोदी सरकारने घेतलेले निर्णय कारणीभूत असल्याचा आरोप आतापर्यंत विरोधकांकडून होत होता. मात्र आता मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले प्रतापचंद्र सारंगी यांनी सुद्धा, देशातील आर्थिक मंदीला नोटाबंदी आणि जीएसटी कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
पुढे बोलताना त्यानी याच मुद्द्यावरून सरकारची बाजू सुद्धा मांडली. कोणत्याही कंपनी किंवा उद्योगातील कर्मचार्यांना त्यांच्या नोकऱ्या सोडाव्या लागणार नाहीत. तसेच मंदीमुळे उद्योग व्यवसायात कोणताही विशेष फरक पडणार नाही. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला.