मोदी देशाचे नव्हे, द्वेषाचे राजकारण करतायत

By admin | Published: October 12, 2014 10:19 PM2014-10-12T22:19:32+5:302014-10-12T23:32:21+5:30

पृथ्वीराज चव्हाण : यशवंतराव मोहितेंचा फोटो मोदींच्या बरोबरीने लावणे अयोग्य

Modi is not politics of hatred, but of country | मोदी देशाचे नव्हे, द्वेषाचे राजकारण करतायत

मोदी देशाचे नव्हे, द्वेषाचे राजकारण करतायत

Next

कऱ्हाड : ‘नरेंद्र मोदी देशाचे नाही, तर द्वेषाचे राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्या पक्षाच्या मूळ विचाराला विरोध करण्यात यशवंतराव मोहितेंनी आयुष्यभर लढाई केली. परंतु तोच विचार या विभागात पुन्हा रुजवण्याचा खटाटोप सुरू आहे; पण कृष्णाकाठची जनता ही झूल अंगावर कदापिही घेणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ‘निवडून येण्याकरिता ही माणसे यशवंतराव मोहिते यांचा फोटो मोदींच्या बरोबरीने लावत आहेत. हे बरोबर नाही. भाऊंसारख्या थोर व्यक्तीच्या आत्म्याला काय वाटत असेल,’ असेही त्यांनी सांगितले.
रेठरे बुद्रुक येथील जाहीर सभेत ते बोलत होते. विलासराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय काँगे्रसचे सचिव स्वराज वाल्मीक, सरचिटणीस सुरेश कुराडे, आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, जयवंत जगताप, आदित्य मोहिते, विकी मोहिते, उत्तमराव मोहिते, जनता बँकेचे संचालक शंकरराव पाटील, वि. तु. सुकरे, पै. धनाजी पाटील-आटकेकर, शेरेचे सरपंच मोहनराव निकम, राजेंद्र बामणे, मारुती निकम, बबनराव दमामे आदींची उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘या निवडणुकीत फारसे वैचारिक मंथन झाले नाही. एकमेकांवर टीका झाली. निवडणूक म्हणजे वैचारिक मंथन व्हायला हवे. त्यातून सत्ता कुणाकडे द्यायची, हे ठरले पाहिजे. तत्त्वासाठी यशवंतराव मोहिते व आनंदराव चव्हाण यांनी वेगळा विचार मांडला. त्यांना यशवंतराव चव्हाणांनी काँगे्रसच्या मूळ प्रवाहात आणले. त्यानंतर डावा विचार घेऊन काँगे्रस राज्याच्या विकासात कायम पुढे राहिली. यशवंतराव मोहितेंच्या घरातून एखादा त्यांच्या विचाराला तिलांजली देऊन जातीयवादी पक्षांच्या बाजूने तुमच्यापुढे येत आहे. ते विचार झुगारा. संयुुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी जातीयवादी शक्तींना जी उद्दिष्ट्य साध्य करायची होती, ती आता साध्य करण्यासाठी शहा व मोदींची धडपड सुरू आहे.’
मदनराव मोहिते म्हणाले, ‘यशवंतराव मोहितेंना उद्घाटनांचा शौक नव्हता. पृथ्वीराज चव्हाणांनाही तो नाही. पण, दक्षिणमध्ये कासवाच्या गतीने झालेल्या विकासाचा विद्यमान आमदार डंका पिटत आहेत. विकास हरणाच्या गतीने आवश्यक आहे. ती गती पृथ्वीराज चव्हाणांकडे आहे. त्यांनी गावाला अकरा कोटी विकासासाठी दिले. चोवीस तास पाणी योजना दिली. पण, त्याचे काम सुरू होत नाही. भोसले पिता-पुत्र मिनरल वॉटर पितात. गाव मात्र दूषित पाणी पिते.’
पै. धनाजी पाटील म्हणाले, ‘माझे कुटुंब ज्यांनी भरल्या ताटावरून उठवले त्यांचे प्रायश्चित्त त्यांना मिळालेच पाहिजे.’ स्वराज वाल्मीक, सुरेश कुराडे, शंकरराव गोडसे यांची भाषणे झाली. सुहास मोहिते, कृष्णत पवार यांनी सूत्रसंचालन केले. मोहन पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

‘अच्छे दिन’ आले का?
‘भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा नाही़ गडकरी, जावडेकर, फडणवीस यांच्या हातात जनता महाराष्ट्र जाऊ देणार नाही़ नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे, हा प्रश्न पडतो़ आज देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ मोदींचे ‘अच्छे दिन’ येणार होते, त्याचं काय झालं? मोदींनी १०० दिवसांत काळा पैसा परत भारतात आणणार, असे सांगितले होते; पण १०० रुपयेसुद्धा आले नाहीत,’ असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी पाटण मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हिंदुराव पाटील यांच्या प्रचारार्थ ढेबेवाडी येथे आयोजित सभेत लगावला.
महाराष्ट्रातच राहणार
‘मी लोकसभा व राज्यसभेवर खासदार होतो, पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणूनही मी काम पाहिले़ त्यासाठी दिल्लीत राहावं लागतं, गल्लीत नव्हे़ पण, मी आता चार वर्षे झाले महाराष्ट्राच्या राजकारणात आहे़ अन् राज्याच्या राजकारणातच राहणार आहे़ विरोधकांनी चुकीची टीका करण्यापेक्षा विकासाचे बोलावे,’ असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथील शनिवार पेठेत आयोजित सभेत व्यक्त केले.

Web Title: Modi is not politics of hatred, but of country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.