महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची मोदींनी दिली होती ऑफर, शरद पवार यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:51 AM2019-12-03T05:51:20+5:302019-12-03T06:19:08+5:30
'सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी दाखविलेली होती'
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याची ऑफर भेटीत दिली होती. मात्र, जेथून जायचेच नाही, त्या रस्त्याची माहिती तरी कशाला घ्यायची, असे म्हणत आपण ती ऑफर नाकारली, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी सोमवारी केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. ती त्यांनी दिली. त्यावरून राजकीय चर्चा व्हाव्यात, असा कदाचित त्यांचा हेतू असावा. त्या भेटीत त्यांनी मला राज्यात सत्ता स्थापनेकरिता एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला, पण मी एक छोटा पक्ष चालवितो. राष्ट्रीय प्रश्नावर तुम्ही विरोधकांना चर्चेला बोलावले, तर मी नक्की येईन, पण आपले मार्ग वेगळे आहेत. एकत्र येणे शक्य नाही, हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचे पवार म्हणाले. मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली नव्हती. मात्र, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी दाखविलेली होती, असेही पवार म्हणाले.
अजित पवार यांनी बंड केले, त्यामागे आपला हात होता, असे बोललो जात असल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, नेहरू सेंटरमध्ये बैठक चालू असताना माझे काही मतभेद झाले. ते टोकाचे होते. म्हणून मी ती बैठक सोडून आलो. त्या वेळी अजित पवार तेथे होते. एकत्र येतानाच आपल्या दोघांमध्ये एवढे मतभेद आहेत, तर शिवसेना सोबत आल्यास किती मतभेद होतील, असे त्यांना वाटले. त्यातून त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांचा निर्णय घरातल्या एकाही व्यक्तीला आवडला नाही. दुसऱ्या दिवशी येऊन अजितने चूक कबूल केली. मात्र मला महाराष्टÑात स्पष्ट संदेश द्यायचा होता की, माझ्या संमतीने हे बंड झालेले नाही. त्यामुळे मी तातडीने उद्धव ठाकरे यांना फोन केला. त्यांना पूर्ण विश्वास दिला आणि आम्ही दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे मी अजित पवार यांच्या बाजूने नाही हे स्पष्ट झाले.
अजित पवार आता उपमुख्यमंत्री होतील का, असे विचारले असता ते म्हणाले, गेली पाच वर्षे आम्ही सत्तेबाहेर आहोत. त्या काळात पक्षातल्या आमदारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकासाठी धावून जाण्याचे, काम अजितने केले आहे. मी जरी पक्षाचा अध्यक्ष असलो तरी सगळ्यांसाठी राज्यात सहज उपलब्ध होणारा, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा अजितच आहे. पण नाराजी नाट्यामुळे मीच काही काळ मागे राहतो, घाई करू नका, मला थोडा सावरायला वेळ द्या, असे अजितनीच सुचवल्याने त्यांचा शपथविधी झाला नाही. पण हे सरकार व्यवस्थित चालवायचे असेल तर अजितच हवा, असे म्हणणारा पक्षात एक मोठा वर्ग आहे.
रिमोट कंट्रोल नसेल
राज्यातल्या सरकारवर आपला रिमोट कंट्रोल नसेल असे स्पष्ट करुन शरद पवार म्हणाले, मी रिमोट कंट्रोल ठेवण्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे राज्यात विनाकारण दोन सत्ताकेंद्रे होतात. त्याचा फायदा नको ते लोक घेतात. तसे होऊ नये, म्हणून मी स्वत:हून काही सल्ला देणार नाही, पण जेथे त्यांना गरज पडेल तेथे नक्की सल्ला देईन. उद्धव ठाकरे यांना मी ओळखतो, त्यांची कार्यशैली मी पाहिलेली आहे, त्यावरून मी सांगेन, की ते उत्तम प्रशासक होतील.
अत्यंत कठीण काळात पक्षाच्या पाठीशी जयंत पाटील खंबीरपणे उभे राहीले. त्यामुळे सरकार स्थापन होताना पहिली शपथ जयंत पाटील यांनीच घेतली पाहिजे, असा माझा आग्रह होता असेही ते म्हणाले.
लोकांना दर्प आवडला नाही
‘मी पुन्हा येईन’, असे सगळेच म्हणत असतात, त्यात गैर काहीच नाही, मात्र हे म्हणत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. माझे नाव इतिहासजमा होईल, असेही ते म्हणाले. शेवटच्या प्रचारसभांमधील त्यांच्या भाषणांमधून सत्तेचा दर्प येत होता. तो लोकांना आवडला नाही. दिल्लीतही मी आज अनेकांना भेटलो, त्यांच्याही मनात राज्यातल्या नेतृत्वाबद्दलची नाराजी मला दिसली, असा दर्प योग्य नव्हता, असेही पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे ठरतील उत्तम प्रशासक
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद घेण्यास शेवटपर्यंत तयार नव्हते. मी बाळासाहेबांना शब्द दिला होता की, पक्षासाठी काम करणा-या शिवसैनिकाला मी हे पद देईन. मात्र, तीन पक्षांचे सरकार चालवायचे असेल, तर तिन्ही पक्षांना सर्वमान्य होईल आणि सगळ्यांना सोबत नेईल, असा नेता हवा होता. त्यामुळे मीच शेवटी आदेशवजा विनंती केली की, तुम्हीच हे पद घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारले. - शरद पवार