मोदी हिटलरच्या मार्गावर : प्रकाश आंबेडकरांची टीका
By admin | Published: January 17, 2017 06:11 AM2017-01-17T06:11:33+5:302017-01-17T06:11:33+5:30
जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने आधी राजकीय अस्थिरता निर्माण करून, नंतर आर्थिक अस्थिरता आणली
मुंबई : जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने आधी राजकीय अस्थिरता निर्माण करून, नंतर आर्थिक अस्थिरता आणली. त्यानंतर, सगळ्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण मिळवून स्वत:ला हुकूमशहा म्हणून जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचालसुद्धा त्याच मार्गावरून सुरू आहे. नोटाबंदीच्या नावाखाली सुरू झालेल्या फसवणुकीवर, महाराष्ट्र लोकशाही आघाडी जन प्रबोधनाची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती, भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिली.
भारीपच्या मुंबई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेली कारणे बनावट होती. ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांनी तो ८ नोव्हेंबरपूर्वीच बँकांमध्ये भरला होता. नोटाबंदीच्या ५६ दिवसांपूर्वीच बँकामध्ये हे व्यवहार झाले होते.
रिझर्व्ह बँकेने १६ सप्टेंबर व ११ नोव्हेंबर २०१६ या काळातील जमा झालेल्या बँक डिपॉझिटची जी माहिती जाहीर केली आहे, त्यात मोदींच्या दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे,’ असा दावा आंबेडकर यांनी केला. (प्रतिनिधी)