‘व्हॅलेंटाइन डे’ला मोदी-पवारांचे मनोमिलन
By Admin | Published: January 22, 2015 01:30 AM2015-01-22T01:30:30+5:302015-01-22T01:30:30+5:30
विधानसभा निवडणुकीत पवार चुलत्या-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीला मुक्त करा, असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येत आहे.
बारामती : विधानसभा निवडणुकीत पवार चुलत्या-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीला मुक्त करा, असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येत असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. हा कार्यक्रम नेमका ‘व्हॅलेंटाईन डे’ला होत असल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा मनोमिलन सोहळा असल्याचे मानले जात आहे.
बारामतीत शरद पवार अध्यक्ष असलेले विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल आणि कृषी विकास प्रतिष्ठान संस्था अशी दोन शैक्षणिक संकुले आहेत़ त्यापैकी कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून बांधण्यात आलेले दिनकर सभागृह, शेतकरी निवास आणि सेंटर फॉर एक्सलन्स या नव्या इमारतींचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी बुधवारी पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमप आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीतील ‘प्रचारी टीका’ विसरून पवारांनी मोदींचे कौतुक केले. एवढेच नाही तर स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यामुळे उभयतांमधील कटुता निवळली असल्याचे मानले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विकास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मोदी यांनी स्वीकारले असून १४ फेब्रुवारीला मोदी यांचा दौरा निश्चित झाला आहे.
मोदींच्या समोर बारामतीच्या विकासाचा आढावा चित्रफितीतून दाखविला जाणार असून विधानसभेच्या प्रचारात मोदींनी केलेला आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आहे. (प्रतिनिधी)
च् मोदींच्या समोर बारामतीच्या विकासाचा आढावा चित्रफितीतून दाखविला जाणार असून विधानसभेच्या प्रचारात मोदींनी केलेला आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आहे.