हॅट्ट्रिकसाठी मोदींनी निवडले पुन्हा यवतमाळ; दहा वर्षांपूर्वी झालेल्या ‘चाय पे चर्चा’ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:52 AM2024-02-29T07:52:44+5:302024-02-29T07:52:56+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे.
- गजानन चोपडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून २०१४ साली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून लोकसभेची पहिली इनिंग सुरू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पुन्हा यवतमाळची निवड केली. २०१९ मध्येही यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले होते, हे विशेष. बुधवारी पुन्हा त्यांनी यवतमाळातूनच महिला आणि शेतकऱ्यांनाच केंद्रस्थानी ठेवत विकासाची ‘गॅरंटी’ दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. राज्यातील सर्व जागा काबीज करण्याची रणनीती भाजपने आखली असून, पंतप्रधानांचा यवतमाळ दौरा याचाच एक भाग आहे. २००४ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना यवतमाळात त्यांची प्रचार सभा झाली होती. त्यानंतर दहा वर्षांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांनी २० मार्च २०१४ साली दाभडी या गावात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे २३ राज्यांतील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला होता. याच निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी लोकसभेचे रणशिंगही त्यांनी पांढरकवडा येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यातून फुंकले होते. त्यावेळीदेखील भाजपला मोठा विजय मिळाला आणि ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. मोदींसाठी यवतमाळ दौरा ‘लकी’ ठरला.
यवतमाळ ‘लकी’
लोकसभेची हॅट्ट्रिक साधण्याकरिता ‘विकासाची गॅरंटी’ देण्यासाठी मोदींनी यवतमाळचीच निवड केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. पंतप्रधानांच्या भाषणाची सुरुवातही ‘गॅरंटी’ याच शब्दानेच झाली. चाय पे चर्चा झाली तेव्हा जनतेने ३०० जागांवर विजय मिळवून दिला. २०१९ मध्ये ३५० जागा दिल्या आणि आता हीच जनता ‘अब की बार ४०० पार’ केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.