पुणे महापालिका सभागृहात मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 02:05 AM2017-03-16T02:05:37+5:302017-03-16T02:05:37+5:30
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ता व तीसुद्धा स्पष्ट बहुमताने मिळाली असल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह काही औरच होता
पुणे : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ता व तीसुद्धा स्पष्ट बहुमताने मिळाली असल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह काही औरच होता. एका कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून सभागृहात प्रवेश केला. अनेकांना तो कोणी नगरसेवकच आहे, असे वाटले, मात्र नंतर तो कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट होताच त्याला सभागृहातून बाहेर घालवून देण्यात आले.
महापौरपद निवडणुकीच्या आधी भाजपाचे नगरसेवक एकत्रितपणे महापालिका सभागृहात आले. केशरी रंगाचा फेटा, त्याच्या तुऱ्यात हिरव्या रंगाचे चक्र अशा वेशातील या नगरसेवकांच्या बरोबरच हा मोदी यांचा मुखवटा घातलेला कार्यकर्ताही सभागृहात आला. आल्याबरोबर त्याच्या मुखवट्यामुळे सर्वांचे लक्ष त्याने वेधून घेतले. त्यालाही त्यात मजा वाटू लागली. काही नगरसेवकांनी त्याला समोरच्या बाजूला बोलावून त्याच्याबरोबर सेल्फीही काढून घेतला. भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनाही हा मोह आवरला नाही. त्यांनीही छायाचित्र काढून घेतले.
(प्रतिनिधी)