मोदी-शहांच्या हाती मुंबईचे राजकारण!
By admin | Published: November 22, 2015 02:55 AM2015-11-22T02:55:45+5:302015-11-22T02:55:45+5:30
मुंबई व मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे महत्त्व आता कमी झाले असून, त्याबाबतचे सर्व राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा
- (डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी)
मुंबई व मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे महत्त्व आता कमी झाले असून, त्याबाबतचे सर्व राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून केले जात आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी शनिवारी येथे केले.
१६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात ‘मुंबईचे राजे.. मुंबईचे रंक’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकार शैक्षणिक व सांस्कृतिक धोरणामध्ये बदल घडवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सांस्कृतिक दहशतवाद देशात पसरवित असल्याची टीका केली.
साहित्य संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सत्रामध्ये भगत यांच्यासह कोमसापचे संमेलनाध्यक्ष जयंत पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, भारतकुमार राऊत, मुंबईचे अभ्यासक सुहास सोनावणे आणि अरुण पुराणिक या तज्ज्ञांनी बदलत्या मराठी महामुंबईबद्दल आपली भूमिका तपशीलवारपणे विशद केली. लोकशाहीर भगत म्हणाले की, मराठीचे राजकारण करणाऱ्यांनी पहिल्यांदा धारावीचे राजकारण, तेथील सामाजिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, मोदी आणि अमित शहा यांच्या हाती मराठीच्या राजकारणाचा कंट्रोल गेला आहे. त्यामुळे जातीयवादी लोक शहरांच्या विकासाला जातीय रंग देत आहेत. आरएसएस देशात सांस्कृतिक दहशतवाद पसरवित असून, केंद्र सरकार त्यांचा छुपा अंजेडा राबवित असल्याची टीका त्यांनी केली.
प्रकाश अकोलकर म्हणाले, ‘एका सर्वेक्षणानुसार २०२५ सालापर्यंत मुंबापुरीची लोकसंख्या अडीच कोटींच्या घरात पोहोचणार आहे. त्यामुळे त्या वेळी उद्भविणाऱ्या समस्या विचारात घेऊन आतापासून उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
कोमसापचे संमेलनाध्यक्ष जयंत पवार म्हणाले, ‘ज्यांच्या हातात पैसा त्यांच्याच हाती मुंबईची सत्ता असे समीकरण बनले आहे. गेली कित्येक वर्षे बिल्डर, माफिया आणि सत्ताधारी यांच्याच हातात या महानगराची सूत्रे राहिलेली असून, ही शोषणाची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे कष्टकरी समाज हद्दपार होत चालला आहे. (प्रतिनिधी)