मोदींनी निवडणुकीतील आश्वासने पाळावीत
By admin | Published: September 22, 2016 05:07 AM2016-09-22T05:07:30+5:302016-09-22T05:07:30+5:30
पाकिस्तानशी आता केवळ चर्चेने काम होणार नाही, तर त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे
मुंबई : पाकिस्तानशी आता केवळ चर्चेने काम होणार नाही, तर त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे सांगत सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी जी आश्वासने दिली, ती त्यांनी पाळावीत, जनतेने मोठ्या विश्वासाने मते दिली आहेत, हे पंतप्रधान मोदींनी विसरता कामा नये, अशा शब्दांत शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला.
उरीतील हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानची भाषा आपल्याला कधी समजणार? पाकिस्तान भारताशी कसा वागतो हे लक्षात ठेवा, त्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले.
हल्ल्यांची मालिका पाहता, ज्याला जे अश्रू ढाळायचेत ते ढाळा, आम्ही मात्र पाकिस्तानात जाऊन चहा पिऊन येतो, असेच जणू सरकार सांगत असल्याचे वाटत आहे, उद्धव म्हणाले. आपण संतापतो, थंड होतो आणि पुन्हा पाकमध्ये जाऊन गरम चहा पितो, पाकिस्तानचे कलाकार, खेळाडू सगळ्यांचे स्वागत करतो, असा टोलाही उद्धव यांनी हाणला.
(विशेष प्रतिनिधी)
>मराठा आरक्षणावर स्वतंत्र अधिवेशन बोलवा
मराठा आरक्षणावर एक दिवसीय स्वतंत्र अधिवेशन बोलवावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचप्रमाणे, मराठा आरक्षणाच्या प्रश्नी प्रत्येक नेत्याने मत मांडावे, असे आवाहनही त्यांनी केले. अॅट्रॉसिटी आणि आरक्षणावर विधिमंडळात चर्चा करावी. शरद पवारांनी या विषयावर संसदेत मुद्दा मांडावा, आम्ही राज्याच्या विधिमंडळात मांडू, असेही ते म्हणाले.