मोदी बाथरुमछाप राजकारण बंद करा - उद्धव ठाकरे
By admin | Published: February 13, 2017 07:37 AM2017-02-13T07:37:44+5:302017-02-13T07:39:59+5:30
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज अत्यंत बोच-या शब्दात भाजपावर टीका करत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज अत्यंत बोच-या शब्दात भाजपावर टीका करत आहेत. आजच्या अग्रलेखात त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ घेऊन बाथरुमछाप राजकारण बंद करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुस-यांच्या बाथरुममध्ये डोकावण्यात रस असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, मुंबईचे पाटणा झाले आहे. म्हणजे नक्की काय? मुळात पाटणा शहर आता बऱ्यापैकी आकार घेत आहे व पारदर्शकतेच्या क्रमवारीत पाटणा नागपूरच्या वर आहे. मुंबईत बसून पाटण्यावर हल्ले करण्यापेक्षा नागपूर शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देणे गरजचे आहे असेही मुख्यमंत्र्यांना सुनावण्यात आले आहे.
पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी पक्षीय प्रचाराच्या शेणफेकीपासून दूर रहावे. ज्या सरकारी कवचकुंडलात व शासकीय इतमामात तुम्ही प्रचारासाठी फिरता व बोलता तो एक प्रकारे निवडणूक भ्रष्टाचारच म्हणावा लागेल असे अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकावण्यात रस असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ‘रेनकोट’ आंघोळ काढली. त्यावर चिरंजीव राहुल गांधी यांचे हे प्रत्युत्तर असावे. उत्तर प्रदेशच्या प्रचार सभेत मोदी यांनी अशीही धमकी दिली की, ‘‘तुमच्या सगळ्यांच्याच कुंडल्या आमच्याकडे आहेत.’’ यावर अखिलेश यादव यांचे प्रत्युत्तर असे की, ‘गुगलवर सगळ्यांच्याच कुंडल्या आहेत. इंटरनेटच्या जमान्यात सगळ्यांच्याच कुंडल्या एका क्लिकवर मिळतात.’ उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक प्रचाराची पातळी किती खालच्या पातळीवर घसरली आहे याचा हा उत्तम नमुना. अशा चिखलफेकीत निदान देशाच्या पंतप्रधानांनी किंवा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तरी सामील होऊ नये. शेवटी त्या पदाची एक प्रतिष्ठा आहेच व ती राखण्याचे काम पदावर बसलेल्या व्यक्तीनेच करायचे असते.
- दुर्दैवाने लोकशाहीच्या हमामात सगळेच नंगे झाल्यावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसारखे लोक तरी कसे दूर राहतील? पुन्हा ‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या उक्तीप्रमाणे तुम्ही आमच्या अंगावर चिखल फेकलात तर आम्ही शेणाच्या डबक्यात उडय़ा मारू. स्वतः रंगू व तुम्हालाही रंगवू असे आपल्या लोकशाहीप्रधान निवडणुकीत सुरू आहे. म्हणूनच आम्ही अत्यंत विनम्र भावाने सूचना केली होती की पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी पक्षीय प्रचाराच्या शेणफेकीपासून दूर रहावे. ज्या सरकारी कवचकुंडलात व शासकीय इतमामात तुम्ही प्रचारासाठी फिरता व बोलता तो एक प्रकारे निवडणूक भ्रष्टाचारच म्हणावा लागेल. पण तो आपल्या देशात राजरोस सुरूच आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान प्रचार सभांमध्ये जाऊन जे इशारे, धमक्या, घोषणा, वचने देत असतात ते कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसते? विरोधकांच्या कुंडल्या तुमच्या हातात आहेत. कारण तुम्ही त्या सत्तेच्या खुर्चीवर जनतेच्या कृपेने आज विराजमान आहात. कुंडल्या काढून तुम्ही एकप्रकारे सत्तेचा गैरवापरच करीत आहात ना? अशा कुंडल्या काढण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्ता दिलीय असे वाटत नाही.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा अधूनमधून ‘विरोधकांच्या कुंडल्या काढू, माझ्या हातात आहेत’ असे सांगत असतात. उद्या सत्तेवरून खाली उतरताच नव्या सत्ताधाऱ्यांच्या हाती तुमच्याही कुंडल्या लागू शकतात. सत्तेचा खेळ हा संगीत खुर्ची किंवा खो-खोचा खेळ आहे हे मान्य करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर व पाय जमिनीवर असतात. पंतप्रधानांचे म्हणणे असे आहे की, उत्तर प्रदेशात बजबजपुरी आहे व तिकडे महिलांना संध्याकाळी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. हे सत्य असेल तर उत्तर प्रदेशातील भाजपचे सत्तरेक खासदार काय करीत आहेत? की तेसुद्धा संध्याकाळ झाल्यावर आपापल्या घराचे दरवाजे बंद करून गोधडीत शिरतात? त्यांनी तेथील महिलांच्या रक्षणासाठी बाहेर पडावे. जसे मुंबईत आमचे शिवसैनिक करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, मुंबईचे पाटणा झाले आहे. म्हणजे नक्की काय? जर मुंबईचे पाटणा झाले असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांचे गृहखाते झोपले आहे काय? मुळात पाटणा शहर आता बऱ्यापैकी आकार घेत आहे व पारदर्शकतेच्या क्रमवारीत पाटणा नागपूरच्या वर आहे.
- बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी भाजपचा पराभव केल्यापासून पाटण्याची जनता अधिक सुरक्षित झाल्याचे बोलले जाते. पाटण्याची जनता मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींचा पाढा वाचत असेल तर पाहावे लागेल व हे तक्रारदार कोण, याचा तपास नितीशकुमारांनी केला तर बरेच होईल. तेथे सार्वभौम राजवट आहे व त्यांचे प्रश्न त्यांना सोडवू द्या. मुंबईत बसून पाटण्यावर हल्ले करण्यापेक्षा नागपूर शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देणे गरजचे आहे. पाटण्याचे काय करायचे ते नितीशकुमार पाहतील. उत्तर प्रदेशचा निकाल जो लागायचा तो लागेलच. पंतप्रधानांनी दिल्लीकडे व मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे पाहावे. बाथरूममध्ये डोकावून पाहणे (दुसऱ्यांच्या) कुणालाच शोभत नाही. हे टाळायला हवे.