पंतप्रधान मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का ? – कन्हैया कुमार
By admin | Published: April 23, 2016 07:17 PM2016-04-23T19:17:58+5:302016-04-23T19:17:58+5:30
पंतप्रधान मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का? मराठवाड्यात असलेल्या तापमानात मोदी राहतील का? असा सवाल कन्हैय्या कुमारने विचारला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २३ - पंतप्रधान मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का? मराठवाड्यात असलेल्या तापमानात मोदी राहतील का? असा सवाल विचारत जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. चेंबूर इथल्या टिळक नगरच्या आदर्श विद्यालयात आयोजित सभेदरम्यान बोलताना कन्हैय्या कुमारने हे वक्तव्य केलं आहे. सभेअगोदर कन्हैय्या कुमारने चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.
कन्हैय्या कुमारने केंद्र सरकारवर टीका करत मोदी सरकार नव्हे, केंद्र सरकार किंवा संघ सरकार म्हणा असं म्हटलं आहे. या देशात प्राण्यांनाही जातीयवादी बनवले जात आहे. मी ‘कास्ट पॉलिटिक्स’ नव्हे, ‘सोशल जस्टिस पॉलिटिक्स’ करत आहे. ही लढाई व्यापक होत चालली आहे. संसदेत विरोधक आहेत की नाही, हे माहित नाही, पण रस्त्यावर आपण विरोधक आहोत असंदेखील कन्हैय्या कुमार बोलला आहे.
शिक्षणावर होणारा खर्च गुंतवणूक असते. गरिबांच्या मुलांना शिक्षण मोफत द्या असं आवाहन कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींना केलं आहे. देशात लोकांना रोजगार नाही आणि मोदी बुलेट ट्रेनबाबत बोलत आहेत. आता ओएलक्सचा जमाना आहे, लवकर काही तरी करा, अन्यथा लोक तुम्हाला हटवतील असा इशारा कन्हैय्या कुमारने दिला आहे.